पट्टेवाटपासाठी अट शिथिल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:38 IST2021-05-07T04:38:14+5:302021-05-07T04:38:14+5:30
गडचिरोली : गैरआदिवासी नागरिकांना वनपट्टा देण्यासाठी शासनाने ७५ वर्षांपासून जमिनीवर अतिक्रमण करून असल्याचा दाखला जोडावा लागतो. सदर अट शिथिल ...

पट्टेवाटपासाठी अट शिथिल करा
गडचिरोली : गैरआदिवासी नागरिकांना वनपट्टा देण्यासाठी शासनाने ७५ वर्षांपासून जमिनीवर अतिक्रमण करून असल्याचा दाखला जोडावा लागतो. सदर अट शिथिल करण्याची मागणी आहे. शेकडो दावे तहसीलदारांमार्फत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत. मात्र, ७५ वर्षांची अट असल्याने अनेक दावे प्रलंबित आहेत.
रेगडी येथे बँक शाखा सुरू करा
घोट : घोटपासून १५ किमी अंतरावर असलेल्या रेगडी येथे बँक शाखा स्थापन करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. रेगडी परिसरात २५ ते ३० गावांचा समावेश आहे; शिवाय येथे पोलीस मदत केंद्र, शासकीय आश्रमशाळा, धर्मराव हायस्कूल, जि. प. उच्च प्राथमिक शाळा, शासकीय व निमशासकीय कार्यालये आहेत.
अनेक वॉर्डांतील नाल्यांची दुरवस्था
गडचिरोली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत. शिवाय शहरातील रस्ते अरुंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता असते. या नाल्यांवर कोणतेच आच्छादन नसल्यानेही किरकोळ अपघात घडतात.
मोहलीचा मनाेरा ठरताेय कुचकामी
धानोरा : तालुक्यातील मोहली येथे बीएसएनएलचा मनोरा आहे, परंतु त्याची क्षमता कमी असल्याने दुर्गम परिसरातील ग्राहकांना याचा लाभ होत नाही. मोहली, दूधमाळा, गिरोला, गोडलवाही आदी ठिकाणी भ्रमणध्वनी मनोरे नाहीत. त्यामुळे मोहली येथील मनोऱ्याची रेंज वाढवावी, अशी मागणी होत आहे.
स्मशानभूमींची दुरवस्था वाढली
कुरखेडा : जि.प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली तरी ग्रामीण भागातील अनेक गावांतील जुन्या स्मशानभूमींची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून, जाण्यासाठी रस्ताही नाही.
मामीडीताेगूजवळ पूल बांधण्याची मागणी
झिंगानूर : झिंगानूर ते सिरकोंडा या मुख्य रस्त्यावर मामीडीतोगू नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पूल नसल्याने पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प राहते. त्यामुळे पुलाची निर्मिती होणे आवश्यक आहे.
भिवापूर-आमगाव मार्गाची दुर्दशा
चामोर्शी : तालुक्यातील भीवापूर क्रॉसिंग-आमगाव (महल)-नेताजीनगर हा १५ किमीचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. डांबर निघून मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहन चालकांना या रस्त्यावरून वाहने चालविणे कठीण होत असल्याने सदर मार्गाची दुरुस्त करण्यात यावी.
पुलाअभावी वाहतूक होते वारंवार प्रभावित
कमलापूर : अहेरी तालुक्याच्या कमलापूर भागात नदी व नाल्यांची संख्या मोठी आहे. अनेक गावांना जाताना नाले पडतात. मात्र, या नाल्यांवर अद्यापही पुलांचे बांधकाम करण्यात न आल्याने नागरिकांना पावसाळ्यात पाण्यातूनच आवागमन करावे लागते. मात्र, या गंभीर समस्येकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
आरोग्य उपकेंद्रांना इमारतीची प्रतीक्षा
गडचिरोली : उपकेंद्र गावातीलच एका लहानशा भाड्याच्या खोलीत चालविले जात आहेत. इमारत नसल्याने प्रसूती कक्षाची सुविधा नाही. त्यामुळे लांब अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर मातांना प्रसूतीसाठी न्यावे लागत आहे. आरोग्य उपकेंद्रासाठी स्वतंत्र इमारत बांधण्याची मागणी होत आहे.
विश्रामगृहाची मागणी प्रलंबितच
कोरची : कोरची तालुक्याची लोकसंख्या व भौगोलिक विस्तारित क्षेत्राचा विचार करून कोरची येथे शासकीय विश्रामगृह आवश्यक आहे. तशी मागणी नागरिकांकडून अनेकदा करण्यात आली.
शासकीय विहिरीवर खासगी पंपांचा कब्जा
धानाेरा : तालुक्यातील अनेक शासकीय विहिरींवर खासगी पाणीपंप लावण्यात आले आहेत. मात्र, याबाबत ग्रामीण भागातील नागरिक तक्रार करीत नाहीत. ग्रामपंचायतीने स्वत: दखल घेऊन अशा प्रकारच्या अवैध मोटार काढणे आवश्यक असतानाही दुर्लक्ष आहे.
परवानगी न घेताच घरांचे बांधकाम वाढले
गडचिराेली : नगर परिषद क्षेत्रात घराचे बांधकाम करायचे असेल तर नगर परिषदेकडून रीतसर परवानगी घ्यावी लागते. मात्र, शहरातील बहुतांश घरमालक नगर परिषदेकडे परवानगी न घेताच घरांचे बांधकाम करीत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. नगर परिषदेने कारवाई करण्याची गरज आहे.
सिराेंचा-आसरअल्ली मार्गाची दुर्दशा
सिरोंचा : सिरोंचा-आसरअल्ली या राष्ट्रीय महामार्गाचे काम काही वर्षांपूर्वी झाले होते; परंतु जड वाहतुकीमुळे या रस्त्याची वाट लागली. सध्या ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाल्याने या मार्गे आवागमन करणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दरवर्षी या मार्गाची दुरुस्ती केली जाते.
पळसगावजवळ उंच पूल बांधण्याची मागणी
जोगीसाखरा : जोगीसाखरा ते पळसगाव मार्गावर ३५ वर्षांपूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले; परंतु सदर पूल ठेंगणा आहे. पावसाळ्यात येथून पुराचे पाणी वाहत असते. त्यामुळे मार्गावरील वाहतूक अनेकदा ठप्प होते. या ठिकाणी उंच पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी जोगीसाखरा व पळसगाव येथील नागरिकांनी केली आहे.
सफाई कामगारांना किमान मजुरी द्या
गडचिरोली : जिल्हा परिषद गडचिरोली येथे कार्यरत सफाई कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार मजुरी द्यावी, अशी मागणी कामगारांनी केली आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेत अनेक सफाई कामगार कार्यरत आहेत. यातील बहुतांश कामगार गडचिरोली शहरातच राहतात. मात्र, कामगारांना केवळ १२० ते १५० रुपये एवढीच मजुरी कंत्राटदारामार्फत दिली जात आहे.
राजनगरी अहेरीत घाणीचे साम्राज्य
अहेरी : स्थानिक नगर पंचायत स्वच्छतेबाबत फारशी आग्रही नाही. अनेक ठिकाणी नाल्यांचे बांधकाम अपूर्ण आहे. त्यामुळे सांडपाणी ररस्त्यावरून वाहताना दिसून येत आहे. अहेरी नगर पंचायतीची स्थापना २३ एप्रिल २०१५ रोजी झाली. ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर झाल्यानंतर विकासाला गती मिळेल, अशी आशा शहरवासीय बाळगून होते. मात्र, ही अपेक्षा खोटी ठरली आहे.
वराह बंदोबस्त मोहीम सुरू होणार
गडचिरोली : स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्या वतीने सन २०१७, २०१८ व २०१९ या वर्षांत तीनदा मोकाट वराह पकडण्याची मोहीम राबविण्यात आली. मात्र, पुन्हा शहराच्या विविध भागांत मोकाट वराहांचा हैैदोस वाढला आहे. पालिकेने वराह पकडण्याची मोहीम सुरू करावी, अशी मागणी आहे.
खड्ड्यांमुळे प्रवाशांना २५ कि.मी.चा फेरा
अहेरी : अहेरी-कन्नेपल्ली मार्गावर खड्डे पडल्याने या मार्गाची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे येथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, मार्गाच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अहेरी-कन्नेपल्ली मार्ग सोयीचा आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासकीय यंत्रणेकडून कार्यवाही हाेत नसल्याचे दिसून येते.
भिवापूर-आमगाव मार्गाची दुर्दशा
चामोर्शी : तालुक्यातील भिवापूर क्रॉसिंग-आमगाव (महल)-नेताजीनगर हा १५ किमीचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. डांबर निघून मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना या रस्त्यावरून वाहने चालविणे कठीण होत असल्याने सदर मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी हाेत आहे. प्रशासनाने ठाेस नियाेजन करून या मार्गाची पक्की दुरुस्ती करावी, अशी मागणी हाेत आहे.
खासगी वाहनांकडून नियमांचे उल्लंघन
कुरखेडा : शासनाच्या नियमानुसार एसटीच्या बसथांब्यापासून २०० मीटर अंतरावर खासगी वाहनांना उभे ठेवून प्रवासी भरण्यास बंदी असली तरी कुरखेडा येथे या नियमाचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. अतिक्रमणामुळे शहरामध्ये वाहतुकीची कोंडी होत आहे.
गोगाव बसथांब्यावर गतिरोधक उभारा
गडचिरोली : गडचिरोली-आरमोरी मार्गावर भरधाव वाहतूक होत असल्याने गोगाव येथील बसथांब्यावर गतिरोधक निर्माण करावेत, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. गतिरोधकाअभावी या ठिकाणी अनेकदा अपघात घडले आहेत.
आरमाेरीत पार्किंगच्या व्यवस्थेचा अभाव
आरमाेरी : शहरातील मुख्य चौकात पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिक रस्त्यावरच वाहने ठेवतात. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत असून, अपघाताची शक्यताही वाढली आहे. नगर परिषदेने या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी आहे.
अपंग विवाह अनुदान योजनेची जागृती करा
आष्टी : संपूर्ण महाराष्ट्रात शासनाच्या वतीने अपंग युवक, युवतींसाठी कल्याण विवाह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत अपंग कल्याण विवाह योजना राबविली जाते. मात्र या योजनेची जनजागृती करण्यात येत नसल्याने अनेक अपंग युवक, युवती योजनेबाबत अनभिज्ञ आहेत.
व्यावसायिकांमुळे वाहतुकीला अडथळा
गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौकात मुख्य मार्गाच्या कडेला अनेक किरकोळ दुकानदार दिवसभर हातगाडी लावून विविध साहित्य विकत असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. गांधी चाैकात सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास दुचाकी व हातठेल्यांची गर्दी असते. पालिका प्रशासन कारवाईबाबत सुस्त असल्याचे दिसून येते.
कुपोषित भागामध्ये परसबाग योजना राबवा
गडचिरोली : जिल्ह्यामध्ये कुपोषणाचे प्रमाण अत्याधिक असल्याने शासनाने त्यावर भाजीपाला व फळरोपांचा उपाय शोधला आहे. आदिवासी कुटुंबांना परसबागेत फळझाड व भाजीपाला लागवडीसाठी प्रोत्साहन देणारी योजना राबविण्याची मागणी आहे.
औद्योगिक वसाहती स्थापन करा
गडचिरोली : जिल्ह्यात उद्योगाला चालना देण्यासाठी चामोर्शी, आष्टी, आलापल्ली येथे औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात यावी. या ठिकाणी स्थापन करण्यात येणाऱ्या उद्योगांना ५० टक्के सूट देत वीज, पाणी, जागा व इतर सवलती देण्यात याव्यात, अशी मागणी आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
खांब गाडणाऱ्यांवर कारवाई करा
गडचिरोली : शहरातील मुख्य मार्गावर तसेच अंतर्गत मार्गावर काही नागरिक फलक लावण्यासाठी खड्डा खोदतात. नंतर खड्डा तसाच ठेवला जातो. परिणामी, अपघात होण्याची शक्यता आहे. खड्डे खोदणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे. शहरात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे खड्डे खोदले आहेत.
शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण द्या
काेरची : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातून काही गावांमध्ये लाख शेतीचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात आले. परंतु जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इतर शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण दिल्यास नवीन रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण द्यावे.