उमेदवाराचे नातेवाईक रंगले निवडणुकीच्या रंगात

By Admin | Updated: October 12, 2014 23:32 IST2014-10-12T23:32:41+5:302014-10-12T23:32:41+5:30

जिल्ह्यात तीन विधानसभा मतदार संघात ३६ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांसाठी त्यांचे नातेवाईक सध्या जोमाने प्रचार करीत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात काका- पुतणे, सख्खे भाऊ आमने- सामने

The relatives of the candidate are in the color of election | उमेदवाराचे नातेवाईक रंगले निवडणुकीच्या रंगात

उमेदवाराचे नातेवाईक रंगले निवडणुकीच्या रंगात

गडचिरोली : जिल्ह्यात तीन विधानसभा मतदार संघात ३६ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांसाठी त्यांचे नातेवाईक सध्या जोमाने प्रचार करीत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात काका- पुतणे, सख्खे भाऊ आमने- सामने अहेरी विधानसभा क्षेत्रात मैदानात आहेत. तर मुलगी व वडील दोन वेगवेगळ्या क्षेत्रात एकाच पक्षाकडून निवडणुक लढत आहेत. जिल्ह्यात सात महिला उमेदवार पहिल्यांदाच रिंगणात उतरल्यामुळे त्यांचे पतिराजही निवडणुकीसाठी प्रचार करत आहे. पत्नी उभी असली तरी, पती मतदारांना अभिवादन करून मत मागत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
गडचिरोली विधानसभा मतदार संघात काँग्रेसच्या सगुणा तलांडी मैदानात आहेत. तलांडींच्या प्रचारासाठी त्यांचे पती माजी आमदार पेंटारामा तलांडी काँग्रेसच्या जुन्या, नव्या नेत्यांना समजाविण्याबरोबरच मतदारांनाही विजयासाठी हात जोडत आहेत. सगुणातार्इंचे जावई स्वप्नील गोधनकर हेही सासुबार्इंच्या प्रचारासाठी जोमाने भिडले आहेत. ते औषध विक्रेते आहेत. मात्र सध्या ते प्रचारात पूर्णवेळ लक्ष घालून आहे. याच मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भाग्यश्री धर्मरावबाबा आत्राम या रिंगणात आहेत. त्यांच्यासाठी त्यांचे यजमान ऋतुराज हलगेकर प्रचाराचे सर्व मॅनेजमेंट सांभाळत आहेत. हलगेकर हे कर्नाटकाच्या बेळगावमधील कायमचे रहिवासी आहेत. मराठा समाजाच्या हलगेकरांचे संबंध नातेवाईक सध्या प्रचारासाठी गडचिरोलीत दाखल झाले आहेत. हलगेकरांची आई संयोगिता हलगेकर सुनेसाठी धानोरा, चामोर्शीसारख्या भागातही मतदारांना मत मागण्यासाठी जात आहे. भाजपचे उमेदवार देवराव होळी यांच्या पत्नी बिनाराणी या बंगाली समाजाच्या आहेत. गडचिरोली विधानसभा मतदार संघात हा समाज मोठ्या संख्येने आहे. बिनाराणी या व्यवसायाने प्राथमिक शाळेच्या शिक्षक आहेत. त्यांचा दांडगा जनसंपर्क या भागात आहे. त्यामुळे त्या पतींसाठी मतदारांना साकडे घालत आहे. गडचिरोली विधानसभा मतदार संघातील महिला उमेदवारांची संख्या ६ आहे. या सहाही महिलांचे मुलं, पती व जवळचे नातेवाईक परिसरातील गावे पिंजून काढत आहेत. अहेरी विधानसभा मतदार संघात ९ उमेदवार मैदानात आहेत. धर्मरावबाबा आत्राम हे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून रिंगणात असून धर्मरावबाबांची लहान मुलगी तनुश्री सध्या त्यांच्या प्रचाराची धूरा सांभाळत आहे. आसरअल्लीपासून अहेरीपर्यंत व भामरागडपासून मुलचेरापर्र्यंत सारा भाग पालथा घालत आहे. अपक्ष उमेदवार दीपक आत्राम यांच्या पत्नी अनिता प्रचारासोबतच घरातील येणाऱ्या- जाणाऱ्या कार्यकर्त्यांचे नियोजन सांभाळण्याचे काम करीत आहे. अहेरीचे भाजप उमेदवार अम्ब्रीशराव महाराज यांना राजकारणाचे व प्रचाराचे सारे फंडे त्यांच्या मातोश्री राजमाता रूक्मिणीदेवी यांच्याकडून मिळत आहे. माहेरीही राजकारणाचे अनेक पट पाहिलेल्या रूक्मिणीेदेवी यांनी श्रीमंत राजे विश्वेश्वरराव महाराज व राजे सत्यवानराव महाराज यांच्या अनेक निवडणुका प्रचाराच्या रणधुमाळीने गाजवल्या आहेत. त्यांच्या अनुभवाचा लाभ या निवडणुकीत अम्ब्रीशरावांना होत आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसकडून आनंदराव गेडाम मैदानात आहेत. ते दिवसभर प्रचार यंत्रणेत असतांना त्यांच्या पश्चात घराचा सारा कारभार त्यांच्या पत्नी सांभाळत आहेत. त्या शिक्षिका आहेत. डॉ. रामकृष्ण मडावी शिवसेनेकडून मैदानात आहेत. त्यांचेही कुटुंबिय येणाऱ्या कार्यकर्त्यांचा सारा राबता सांभाळून प्रचाराची यंत्रणा सजग ठेवण्याकडे लक्ष देत आहे. या शिवाय राजकीय पक्षाचे कार्यकर्तेही निवडणुकीच्या काळात कुटुंबासह मैदानात उतरले आहेत.
(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: The relatives of the candidate are in the color of election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.