दुर्गम गावांचे पुनर्वसन रखडले
By Admin | Updated: March 6, 2015 01:31 IST2015-03-06T01:31:59+5:302015-03-06T01:31:59+5:30
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात अजूनही ७० ते ८० गावामध्ये रस्ता व ६० गावांमध्ये विज पोहचलेली नाही. भामरागड, कोरची आदी तालुक्यामध्ये अनेक कमी ...

दुर्गम गावांचे पुनर्वसन रखडले
गडचिरोली : गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात अजूनही ७० ते ८० गावामध्ये रस्ता व ६० गावांमध्ये विज पोहचलेली नाही. भामरागड, कोरची आदी तालुक्यामध्ये अनेक कमी लोकसंख्येचे गाव आहेत. या गावातील नागरिकांना तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी किंवा मोठ्या गावात आणून त्यांचे पुनर्वसन करण्याची योजना तयार करण्यात आली होती. परंतु ही योजना अद्यापही मूर्तरूप घेऊ शकलेली नाही. त्यामुळे ही गावे सोयीसुविधांपासून वंचित राहिली आहे. व प्रशासनाही येथे विज, पाणी, रस्ते आदी पोहचविण्यात अडचणी येत आहेत.
गडचिरोली जिल्हा हा विस्ताराने प्रचंड मोठा आहे. जवळजवळ ४२० किलोमिटरच्या परीघात या जिल्ह्यातील १२ तालुके येतात. यातील कोरची व भामरागड हे छत्तीसगड सीमेवरचे संवेदनशील तालुके आहेत. या तालुक्यात अनेक गावे ही दीडशे दोनशे वा त्यापेक्षा कमी लोकसंख्येची आहे. या गावात जिल्हा प्रशासनाचे अधिकारीही कधी जात नाही. येथील जनतेला अजूनही मुलभूत सोयीसुविधा प्रशासनाला पोहचविता आल्या नाही. एकच नाला किमान पाच ते सात वेळा ओलांडून या गावात पायी जावे लागते.
भामरागड तालुक्यात १२८ गावे आहेत. कोरची तालुक्यात १३३ गावे आहेत. यातील किमान ३० ते ४० गावातील नागरिकांपर्यंत वीज, पाणी अजुनही पोहचलेले नाही. भामरागड तालुक्यातील बिनागुंडा परिसरातील सात ते आठ गावांमध्ये केवळ सरकारच्या शाळा व ग्रामपंचायतीच सुरू होऊ शकल्या. बाकी सोयीसुविधांचा पत्ताही नाही.
जिल्ह्यातील अशा गावांची आकडेवारी तयार करून या गावातील नागरिकांना तालुका मुख्यालयात आणून वसविण्याची योजना प्रशासनाने तयार केली होती. तालुका मुख्यालयात आणल्यावर तेथे त्यांना शासकीय योजनांचा लाभ देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार होते. त्यामुळे सरकारी यंत्रणेवरचा भारही बराचसा हलका होणार होता. शिवाय सर्व नागरिकांना सोयीसुविधाही देणे शक्य होणार होते. परंतु या भागातील नागरिक या पुनर्वसनासाठी राजी झाले नाहीत असे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे हा प्रस्ताव बारगळला आहे.
राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने काही दिवसांपूर्वी लहान गावातील आश्रमशाळा तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी हलविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयावर अंमलबजावणी झाली नाही. गडचिरोली जिल्ह्यात अनेक गाव नक्षली दहशतीच्या छायेत आहे. या गावातील सधन नागरिकांनी गाव सोडून तालुका मुख्यालयात घर बांधले आहे. त्यामुळे त्यांचा गावाशी संपर्क तुटला आहे. मात्र दारिद्र्य रेषेखालील लोक गावातच राहतात. (प्रतिनिधी)