१ कोटी २६ लाखांचा परतावा
By Admin | Updated: April 9, 2016 00:38 IST2016-04-09T00:38:15+5:302016-04-09T00:38:15+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा अहेरीच्या वतीने २०१५- १६ या हंगामात १ कोटी ४६ लाख रूपयांचे शेतकऱ्यांना कर्ज वितरण करण्यात आले होते.

१ कोटी २६ लाखांचा परतावा
गत हंगामात १ कोटी ४६ लाखांचे वितरण : जिल्हा बँक अहेरी शाखेची ८६ टक्के कर्ज वसुली
अहेरी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा अहेरीच्या वतीने २०१५- १६ या हंगामात १ कोटी ४६ लाख रूपयांचे शेतकऱ्यांना कर्ज वितरण करण्यात आले होते. याचा लाभ ३३३ शेतकऱ्यांना झाला होता. ३१ मार्च २०१६ पर्यंत २७९ लाभार्थी शेतकऱ्यांनी एकूण १ कोटी २६ लाख रूपयाचा परतावा केला आहे. त्यामुळे यंदा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा अहेरीची ८६ टक्के कर्ज वसुली झाली आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा अहेरी व विविध सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मागील हंगामात कर्ज वितरण करण्यात आले होते. ३१ मार्चपर्यंत २७९ शेतकऱ्यांनी कर्जाचा परतावा केला आहे. पुनर्पिककर्ज १५ दिवसांत मिळणार असल्याचे बँकेने जाहीर केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उसनवारी व इतर मार्गांनी पैशांची तजवीज करून ३१ मार्चपर्यंत कर्जाची परतफेड केली. त्यामुळे २७९ शेतकऱ्यांनी एकूण पीक कर्जापैकी ८६ टक्के कर्ज परतावा केला. त्यामुळे शेतकरी बँकेच्या व्याज दरापासून मुक्त झाले आहेत. कर्ज वसुली करण्याकरिता बँकेचे वसुली अधिकारी तसेच विविध कार्यकारी संस्थेचे पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी कर्जधारक सभासदांच्या भेटी घेऊन त्यांना कर्जमुक्तीसाठी प्रवृत्त केले. त्यामुळेच अहेरी जिल्हा सहकारी बँक शाखेची ८६ टक्के कर्जवसुली होण्यास मदत झाली. अनेक शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध झाले. (तालुका प्रतिनिधी)
दुष्काळाच्या मोबदल्यापासून शेतकरी वंचित
मागील खरीप हंगामात अत्यल्प पाऊस झाल्याने दरवर्षीच्या सरासरी उत्पादनाच्या तुलनेत मागील हंगामाचे एकूण उत्पादन ३० ते ४० टक्केच आहे. अनेक शेतकऱ्यांना २० ते ३० टक्के एकूण उत्पादनावर समाधान मानावे लागले. जिल्ह्यात १३९८ गावांमध्ये दुष्काळ जाहीर झाला. मात्र अहेरी उपविभागातील अनेक शेतकऱ्यांना दुष्काळातील मदतीचा मोबदला मिळाला नाही. अनेक शेतकरी दुष्काळी मदतीपासून वंचित असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे.