देशात शिक्षण व आरोग्यावर खर्च कमी
By Admin | Updated: March 23, 2015 01:27 IST2015-03-23T01:27:06+5:302015-03-23T01:27:06+5:30
माणसाच्या विकासासाठी सुदृढ व निरोगी शरीर तसेच शिक्षण महत्त्वाचे आहे. भारत देशात आरोग्यावर केवळ १.०४ टक्के खर्च केला जातो.

देशात शिक्षण व आरोग्यावर खर्च कमी
गडचिरोली : माणसाच्या विकासासाठी सुदृढ व निरोगी शरीर तसेच शिक्षण महत्त्वाचे आहे. भारत देशात आरोग्यावर केवळ १.०४ टक्के खर्च केला जातो. विकसित देशात शिक्षणावर १२.३१ टक्के निधी खर्च होणे आवश्यक आहे. मात्र राज्यकर्त्यांच्या भांडवलशाही वृत्तीमुळे आपल्या देशात आरोग्य व शिक्षण या महत्त्वपूर्ण बाबीवर अत्यल्प निधी खर्च केला जात आहे, असे प्रतिपादन आयआयटी खरगपूरचे प्रा. डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी केले.
भारत जन आंदोलन व अखील भारतीय आदिवासी महासभेच्या संयुक्त विद्यमाने रविवारी गडचिरोली येथील संस्कृती सभागृहात आयोजित जनसंघर्ष राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉ. तेलतुंबडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत जन आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार हिरामण वरखडे होते. यावेळी मंचावर आदिवासी महासभेचे राज्याध्यक्ष हिरालाल येरमे, भाकपचे जिल्हा सचिव डॉ. महेश कोपुलवार, भारीप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष रोहिदास राऊत, परिषदेचे समन्वयक महेश राऊत आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. डॉ. तेलतुमडे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी १९४४ मध्ये काही भांडलवादी मंडळींनी आपल्या हितासाठी मुंबई प्लान बनविला होता. त्यावेळी सरकारने या प्लानमधील तरतुदी पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या पंचवार्षिक योजनांमध्ये समाविष्ट केल्या. तेव्हापासूनच कष्टकरी समाजाचे शोषण सुरू झाले. सत्ताधाऱ्यांनी भांडवलवाद, खासगीकरण, उदारमतवाद आदींच्या नावांवर दलित व आदिवासींना धोका दिला, अशी टीका डॉ. तेलतुंबडे यांनी केली. शोषण व्यवस्थेमुळेच अन्याय, अत्याचाराच्या विरोधात आवाज उठविण्याची तीव्र भावना आता जनतेमध्ये निर्माण होत आहे. त्यासाठी योग्य नियोजनबध्द आंदोलन छेडण्याची गरज आहे, असेही ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन प्रास्ताविक महेश राऊत, संचालन अॅड. जगदीश मेश्राम यांनी केले तर अभार हिरालाल येरमे यांनी मानले.
भाकपाचे देवराव चवळे, विनोद झोडगे, जि.प. सदस्य अमोल मारकवार, प्रभू राजगडकर, गंगाराम आतला, छाया पोटावी, वासुदेव आतला, मनोहर तोरे आदीसह भारतीय जनआंदोलनाचे कार्यकर्ते उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)