कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत रिक्त पदांची भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 07:37 PM2020-04-01T19:37:01+5:302020-04-01T19:38:57+5:30

गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि उद्रेकसदृश परिस्थिती हाताळण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आहे. रिक्तपदांमुळे खिळखिळी झालेल्या आरोग्य यंत्रणेला बळकट करण्यासाठी जिल्ह्याच्या आरोग्य विभागातील रिक्त २१० पदे तातडीने भरण्यात येणार आहे.

Recruitment of vacancies in Gadchiroli on the background of Corona | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत रिक्त पदांची भरती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत रिक्त पदांची भरती

Next
ठळक मुद्देनवीन ७६ डॉक्टर मिळणारआरोग्य विभागातील २१० पदे तातडीने भरणार

दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि उद्रेकसदृश परिस्थिती हाताळण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आहे. रिक्तपदांमुळे खिळखिळी झालेल्या आरोग्य यंत्रणेला बळकट करण्यासाठी जिल्ह्याच्या आरोग्य विभागातील रिक्त २१० पदे तातडीने भरण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाच्या वतीने विशेष कंत्राटी पदभरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीतून जिल्ह्याला तज्ज्ञांसह एकूण ७६ नवीन डॉक्टर मिळणार आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा मुख्यालयी दोन शासकीय रुग्णालये आहेत. तालुकास्तरावर तीन उपजिल्हा रुग्णालय व नऊ ठिकाणी ग्रामीण रुग्णालये आहेत. याशिवाय जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत ४५ प्राथमिक आरोग्य व ३०० पेक्षा अधिक उपकेंद्र आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून आरोग्य विभागातील व दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत असते. आता कोरोनासारखे महाभयंकर संकट आले असून याचा संसर्ग होऊ नये, यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे. त्यापलिकडेही जिल्ह्यात असलेल्या दवाखान्याची आरोग्य सेवा पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून सुदृढ करावयाची आहे. त्यासाठी जिल्हा निवड समितीमार्फत एकूण २१० पदांसाठी विशेष कंत्राटी पदभरती प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.
विशेष कंत्राटी पदभरतीदरम्यान भरावयाची सर्वच २१० पदे ही कंत्राटी/करार तत्त्वावरील असून राज्य शासनाची अथवा राष्ट्रीय आरोग्य अभियानाची नाहीत. सदर भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना ३१ मे २०२० पर्यंत किंवा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात येईपर्यंत यापैकी जो कालावधी आधी येईल, तोपर्यंतच्या कालावधीसाठीच नियुक्ती दिली जाणार आहे. त्यानंतर सदर नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल. भरण्यात येत असलेली २१० पदे ही मानधन तत्त्वावर असून एकत्रित मानधन देण्यात येणार आहे.

या पदांचा समावेश
सुपर स्पेशालिस्ट २ पदे (कार्डिओलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट), भूलतज्ज्ञ ७ पदे, स्त्रीरोग तज्ज्ञ ५ पदे, बालरोग तज्ज्ञ ७ पदे अशी पदे भरण्यात येणार आहे. याशिवाय वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) ९ पदे, वैद्यकीय अधिकारी गट ब (बीएएमएस) ४५ पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ २० पदे, औषध निर्माण अधिकारी २३ पदे व स्टाफ नर्स व एचएचव्हीची मिळून ९२ पदे भरण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य
कोरोनाच्या संचारबंदीमुळे जिल्हा सीमा बंद करण्यात आली असून एसटी व खासगी वाहतूक पूर्णत: ठप्प आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापन नसल्याने शक्यतोवर जिल्ह्यातील उमेदवारांनीच अर्ज सादर करावे, असे प्रशासनाने म्हटले आहे. सदर पदभरतीसाठी मुलाखत होणार नसल्याने उमेदवारांनी आपले अर्ज ई-मेलद्वारेच करावे. कुणीही प्रत्यक्ष कार्यालयात भेट देऊ नये, असे समितीने म्हटले आहे. सदर भरती प्रक्रिया जिल्हाधिकारी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनात होणार आहे.

Web Title: Recruitment of vacancies in Gadchiroli on the background of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.