११ महिन्यांत ५४ लाखांचा दंड वसूल

By Admin | Updated: April 4, 2015 00:44 IST2015-04-04T00:44:05+5:302015-04-04T00:44:05+5:30

विनापरवाना अवैधरित्या मुरूम, रेती, गिट्टी आदी गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक करणे कायद्याने गुन्हा आहे.

Recovery of penalty of 54 lakhs in 11 months | ११ महिन्यांत ५४ लाखांचा दंड वसूल

११ महिन्यांत ५४ लाखांचा दंड वसूल

महसूल विभागाची कारवाई : गौण खनिज अवैध उत्खनन व वाहतुकीचे ८३५ प्रकरण
दिलीप दहेलकर  गडचिरोली
विनापरवाना अवैधरित्या मुरूम, रेती, गिट्टी आदी गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र असे असतानाही अनेक नागरिक स्वत:च्या स्वार्थासाठी छुप्या मार्गाने गौण खनिजाचे अवैधरित्या उत्खनन व वाहतूक करतात. या प्रकारावर आळा घालण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर पथक नियुक्ती करण्यात आले आहे. एप्रिल २०१४ ते फेब्रुवारी २०१५ या ११ महिन्यांच्या कालावधीत महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचारी ८३५ प्रकरणात एकूण ५४ लाख तीन हजार ४१२ रूपयांचा दंड वसूल केला.
जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील रेती, गिट्टी, मुरूम आदी गौण खनिजाचे अवैधरित्या उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी संबंधित तालुक्यातील महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची असते. तालुक्याचे तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी आपल्या क्षेत्रात धाड सत्र राबवून गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक प्रकरणी कारवाई करीत असतात.
गडचिरोली व धानोरा तालुक्याचा समावेश असलेल्या गडचिरोली उपविभागात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडसत्र राबवून एप्रिल २०१४ ते फेब्रुवारी २०१५ या ११ महिन्यांच्या कालावधीत अवैधरित्या गौण खनिजाच्या उत्खनन व वाहतुकीचे ३२१ प्रकरणात कारवाई केली. या प्रकरणातून संबंधित दोषी नागरिकांकडून २३ लाख १७ हजार ४८० रूपयांचा दंड वसूल केला. चामोर्शी व मुलचेरा तालुक्याचा समावेश असलेल्या चामोर्शी उपविभागात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी १०८ प्रकरणात आठ लाख ८१ हजार ८३० रूपयांचा दंड वसूलल केला. देसाईगंज व आरमोरी तालुक्याचा समावेश असलेल्या देसाईगंज उपविभागात अधिकाऱ्यांनी धाडसत्र राबवून १५८ प्रकरणात कारवाई करून एकूण आठ लाख २३ हजार ९८२ रूपयांचा दंड संबंधितांकडून वसूल केला. कुरखेडा उपविभागात अधिकाऱ्यांनी धाड टाकून ५८ प्रकरणात कारवाई करून संबंधितांकडून चार लाख २७ हजार ४०० रूपयांचा दंड वसूल केला. अहेरी उपविभागात अधिकाऱ्यांनी अवैध उत्खनन व वाहतुकीच्या १४३ प्रकरणात कारवाई केली. या प्रकरणातून सहा लाख २३ हजार रूपयांचा दंड वसूल केला. एटापल्ली उपविभागात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ४७ प्रकरणात कारवाई करून संबंधितांकडून तीन लाख २९ हजार ७२० रूपयांचा दंड वसूल केला.
एका प्रकरणातील दंड शिल्लक
अहेरी तालुक्यातील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडसत्र राबवून अवैध उत्खनन व वाहतुकीचे १०५ प्रकरणे दाखल केली. यापैकी १०४ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून यातून तीन लाख ९६ हजार २०० रूपयांचा दंड वसूल केला. तर एका प्रकरणातील तीन हजार २०० रूपयांचा दंड अद्यापही शिल्लक आहे.

Web Title: Recovery of penalty of 54 lakhs in 11 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.