नऊ महिन्यांत ५५ लाखांचा करमणूक कर वसूल
By Admin | Updated: December 27, 2014 22:50 IST2014-12-27T22:50:04+5:302014-12-27T22:50:04+5:30
जिल्ह्यातील केबल आॅपरेटर, डीटीएच व इतर करमणुकीच्या माध्यमातून एप्रिल ते डिसेंबर या ९ महिन्यांच्या कालावधीत सुमारे ५४ लाख ८८ हजार रूपयांचा महसूल गोळा झाला आहे.

नऊ महिन्यांत ५५ लाखांचा करमणूक कर वसूल
गडचिरोली : जिल्ह्यातील केबल आॅपरेटर, डीटीएच व इतर करमणुकीच्या माध्यमातून एप्रिल ते डिसेंबर या ९ महिन्यांच्या कालावधीत सुमारे ५४ लाख ८८ हजार रूपयांचा महसूल गोळा झाला आहे.
गडचिरोली जिल्ह्याला २०१४-१५ या आर्थिक वर्षात १ कोटी रूपयांचा करमणूक कर गोळा करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते. गडचिरोली जिल्ह्यात एकूण ७१ केबल आॅपरेटर व १३ हजार ५२१ केबल ग्राहक आहेत. केबल ग्राहकांकडून ९ महिन्यांत २१ लाख ६० हजार रूपयांचा महसूल गोळा करण्यात आला आहे. नगर परिषद क्षेत्रात येत असलेल्या केबल ग्राहकांवर ३० रूपये तर ग्रामीण भागातील केबल ग्राहकांवर शासन १५ रूपये करमणूक कर आकारते.
केबलच्या तुलनेत डीटीएच लावल्याने टीव्ही चांगली दिसते. त्याचबरोबर संपूर्ण चॅनेल डीटीएचवर बघायला मिळतात. त्याचबरोबर केबल तुटल्याचीही तक्रार राहत नाही. त्यामुळे ग्राहक डीटीएचकडे वळत चालला आहे. गडचिरोली जिल्ह्यात सुमारे २० हजार ६७४ डीटीएच आहेत. या डीटीएचच्या माध्यमातून ३२ लाख ९ हजार रूपयांचा महसूल गोळा झाला आहे. डीटीएच रिचार्ज मोबाईलच्या माध्यमातून मारले जातात. त्यामुळे याबाबतची नोंद मुंबई येथील कार्यालयात होते व त्याची एक प्रत जिल्हास्तरावरील कार्यालयाला पाठविले जातात. ध्वनीक्षेपक व मिनाबाजार तसेच इतर माध्यमातून ९३ हजार रूपयांचा महसूल गोळा झाला आहे. एक महिन्यांपूर्वी गडचिरोली येथे चित्रपटगृह सुरू झाले असून या चित्रपटगृहाच्या माध्यमातून २० हजार रूपये महसूल मिळाला आहे. असा एकूण ९ महिन्यांत ५४ लाख ८८ हजार रूपयांचा महसूल गडचिरोली करमणूक विभागाने गोळा केला आहे. (नगर प्रतिनिधी)