१३ कोटी १६ लाखांची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2016 01:05 IST2016-04-06T01:05:23+5:302016-04-06T01:05:23+5:30
जिल्ह्यातील पंचायत समितीमार्फत करारनामे करण्यात आलेल्या ग्रामपंचायतस्तरावरील हातपंप, वीज पंपाच्या देखभाल ...

१३ कोटी १६ लाखांची वसुली
११७ टक्के : हातपंप, वीजपंप देखभाल व दुरूस्ती कर, अपुऱ्या वाहन व्यवस्थेमुळे दुरूस्तीस दिरंगाई
गडचिरोली : जिल्ह्यातील पंचायत समितीमार्फत करारनामे करण्यात आलेल्या ग्रामपंचायतस्तरावरील हातपंप, वीज पंपाच्या देखभाल व दुरूस्तीपोटी जि. प. च्या यांत्रिकी उपविभागामार्फत कर वसुली केली जाते. जि. प. च्या यांत्रिकी उपविभागामार्फत सन २०१५-१६ या वर्षात ग्रामपंचायतीकडून जुनी थकीत व चालू वर्षाची मिळून एकूण १३ कोटी १६ लाख ७ हजार २१८ रूपयांची कर वसुली करण्यात आली आहे. या कर वसुलीची सरासरी टक्केवारी ११७.४९ आहे.
गडचिरोली जिल्ह्यात बाराही तालुके मिळून एकूण हातपंपाची संख्या ९ हजार २८५ असून वीजपंप २८ आहेत. यापैकी ११ पंचायत समितीने एकूण ७ हजार ३८८ हातपंपाचे सन २०१५-१६ या वर्षात देखभाल व दुरूस्ती संदर्भात करारनामे केलेत. २५ वीजपंपाचे करारनामे करण्यात आले. ७ हजार ३८८ हातपंपाच्या देखभाल व दुरूस्तीच्या कामासाठी जि. प. च्या यांत्रिकी उपविभागाने ग्रामपंचायत प्रशासनावर एकूण १ कोटी १० लाख ८२ हजार तर वीज पंपावर १२ लाख ५ हजार रूपयांची कर आकारणी सन २०१५-१६ या चालू वर्षात केली. हातपंप व वीजपंप मिळून जि. प. यांत्रिकी उपविभागाने ग्रामपंचायतीवर एकूण १ कोटी १२ लाख ७ हजार रूपयांची कर आकारणी केली. जि. प. यांत्रिकी उपविभागाने सन २०१५-१६ या चालू वर्षात जुनी थकीत व चालू वर्षाची मिळून एकूण १३ कोटी १६ लाख ७ हजार २१८ रूपयांची कर वसुली करून कर वसुलीचे चालू वर्षात १०० टक्के उद्दिष्ट गाठले आहे.
जिल्हा परिषदेच्या वतीने धानोरासह अनेक तालुक्यांना हातपंप देखभाल व दुरूस्तीच्या कामासाठी एकच वाहन पंचायत समितीस्तरावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. अपुऱ्या वाहन व्यवस्थेमुळे दुर्गम गावातील हातपंपाची कित्येक दिवस दुरूस्ती केली जात नाही. परिणामी अद्यापही अनेक हातपंप नादुरूस्त स्थितीत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)
मुलचेरा तालुक्यात ग्रा. पं. शिपायांवरच हातपंपाची दुरूस्ती
आदिवासीबहुल मुलचेरा तालुक्यात एकूण १६ ग्रामपंचायती असून ६८ गावे आहेत. या गावांमध्ये ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत शिपायांकडूनच हातपंपाची दुरूस्ती करण्यात येते. ग्रामपंचायत प्रशासन हातपंप दुरूस्तीच्या साहित्यांची खरेदी करीत असते. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायती स्वबळावर गावातील हातपंप दुरूस्ती व देखभालीची जबाबदारी सांभाळत आहेत. मुलचेरा तालुक्यात एकूण ५४२ हातपंप आहेत. यापैकी एकाही हातपंपाचा ग्रामपंचायतींनी पंचायत समितीसोबत दुरूस्ती व देखभालीसंदर्भात करारनामा केला नाही.
एटापल्ली आघाडीवर, चामोर्शी पिछाडीवर
एटापल्ली तालुक्यात ग्रामपंचायत अंतर्गत करारनामे केलेले एकूण ६९६ हातपंप व दोन वीजपंप आहेत. या ग्रामपंचायतीने यंदा २०१५-१६ या वर्षात जुनी थकीत व चालू वर्षाची मिळून एकूण २६ लाख ८७ हजार ४३६ रूपयांचे हातपंप देखभाल व दुरूस्ती कामाचे कर पंचायत समितीला अदा केले आहे. या कर वसुलीची टक्केवारी गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक २५४.९७ आहे. चामोर्शी तालुक्यात ग्रामपंचायतीने करारनामे केलेले एकूण ८६४ हातपंप व चार वीजपंप आहेत. या तालुक्यातील ग्रामपंचायतींनी चालू वर्षात केवळ ६४.१२ टक्के कराची रक्कम अदा केली आहे. हातपंप कर वसुलीत चामोर्शी तालुका सर्वाधिक पिछाडीवर आहे.