२ कोटी ६२ लाखांचा निधी प्राप्त
By Admin | Updated: February 20, 2016 02:19 IST2016-02-20T02:19:13+5:302016-02-20T02:19:13+5:30
१४ व्या वित्त आयोगाचा पहिला हप्ता चामोर्शी तालुक्याला नुकताच प्राप्त झाला आहे.

२ कोटी ६२ लाखांचा निधी प्राप्त
१४ वा वित्त आयोग : चामोर्शी तालुक्यात ग्रामीण भागात अनेक विकास कामे सुरू
चामोर्शी : १४ व्या वित्त आयोगाचा पहिला हप्ता चामोर्शी तालुक्याला नुकताच प्राप्त झाला आहे. सुमारे २ कोटी ६२ लाख ३७ हजार १०७ रूपयांचा निधी तालुक्याला मिळाला असून या निधीतून तालुकाभरात विकास कामे सुरू केली जाणार आहेत.
केंद्र शासनाने १ एप्रिल ते २०१५ ते ३१ मार्च २०२० या कालखंडासाठी १४ वा केंद्रीय वित्त आयोग स्थापन केला आहे. या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतीच्या बळकटीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात येते. तीन महिन्यांपूर्वीच सदर निधी जिल्हा परिषदेच्या हेडवर जमा करण्यात आला होता. मात्र सदर निधी कशा पद्धतीने खर्च करावा, याबाबतचे दिशानिर्देश शासनाकडून प्राप्त झाले नव्हते. त्यामुळे सदर निधी ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आला नव्हता. शासनाकडून २१ डिसेंबर २०१५ च्या शासन निर्णयान्वये निधी खर्च करण्याचे निकष ठरविण्यात आले. त्यानंतर सदर निधी ग्रामपंचायतींना वितरित केला गेला.
चामोर्शी हा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. या तालुक्यात सुमारे ७५ ग्रामपंचायती आहेत. १४ व्या वित्त आयोगाचा ९० टक्के निधी लोकसंख्येच्या आधारावर तर १० टक्के निधी क्षेत्रफळाच्या आधारावर वितरित केला जातो.
चामोर्शी तालुक्याला लोकसंख्येच्या आधारावर २ कोटी ४८ लाख ७७ हजार ४१९ व क्षेत्रफळाच्या आधारावर १३ लाख ५९ हजार ६८८ असा एकूण २ कोटी ६२ लाख ३७ हजार १०७ रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून ग्रामपंचायतस्तरावर ग्रामसभेच्या सहमतीने अनेक विकास कामे केली जात आहेत. आर्थिक वर्ष संपण्याच्या पूर्वी सदर निधी खर्च करणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन तत्काळ नियोजन करून विकास कामे करण्याची घाई करीत असल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)