शेततळ्यासाठी ६१० अर्ज प्राप्त

By Admin | Updated: March 29, 2016 02:41 IST2016-03-29T02:41:07+5:302016-03-29T02:41:07+5:30

राज्य शासनाने यावर्षीपासून नव्याने हाती घेतलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला सन २०१६-१७

Receive 610 applications for the farmland | शेततळ्यासाठी ६१० अर्ज प्राप्त

शेततळ्यासाठी ६१० अर्ज प्राप्त

दिलीप दहेलकर ल्ल गडचिरोली
राज्य शासनाने यावर्षीपासून नव्याने हाती घेतलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला सन २०१६-१७ या वर्षात एकूण १ हजार ३४० शेततळे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहेत. २९ फेब्रुवारीपासून २८ मार्चपर्यंत शेततळ्याच्या लाभासाठी जिल्ह्यातील एकूण ६१० शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज सादर केले आहेत. आणखी जिल्हाभरातील शेतकरी शेततळ्याच्या लाभासाठी आॅनलाईन अर्ज सादर करण्यासाठी तालुकास्तरावर व मोठ्या गावातील सायबर कॅफेमध्ये धाव घेत आहेत.
राज्यातील टंचाईग्रस्त परिस्थिती पाहून राज्य शासनाने ‘मागेल त्याला शेततळे’ ही वैयक्तिक लाभाची योजना यावर्षीपासून हाती घेतली. या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांना आॅनलाईन अर्ज सादर करण्यासाठी राज्य शासनाने २९ फेब्रुवारी २०१६ पासून ‘आपले सरकार’ या नावाची वेबसाईड सुरू केली. वेबसाईड सुरू झाल्याच्या तारखेपासून ४५ दिवसांत अर्ज सादर करण्याची मुदत शासनाने दिली आहे. सदर योजनेच्या लाभासाठी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळावा, या उद्देशाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली. तालुका स्तरावरील कृषी कार्यालयातील कर्मचारी या योजनेची माहिती गावात जाऊन देत आहेत. शिवाय पत्रके वितरित करून या योजनेची जनजागृती करण्यात आली. आॅनलाईन अर्ज सादर केलेल्या ६१० शेतकरी लाभार्थ्यांपैकी ३९३ शेतकऱ्यांचे शुल्क आॅनलाईन स्वीकारण्यात आले आहे. या संदर्भात संबंधित शेतकऱ्यांच्या भ्रमणध्वनीवर तसे संदेश प्राप्त झाले आहेत.

लाभासाठी या आहेत अटी
मागेल त्याला शेततळे या योजनेच्या लाभासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर कमीत कमी ०.६० हेक्टर आर. शेतजमीन असावी. लाभार्थी शेतकऱ्याची जमीन शेततळ्यासाठी तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक राहिल. यापूर्वी अर्जदार शेतकऱ्यांनी शेततळे, सामुहिक शेततळे, भातखाचर तसेच बोडी या घटकांचा शासकीय योजनांमधून लाभ घेतलेला नसावा. सदर योजनेचा लाभ सर्व प्रवर्गातील शेतकरी घेऊ शकतात.

असे मिळणार अनुदान
मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत शासनाकडून शेततळ्याचे आकारमान, पृष्ठभागाचे क्षेत्रफळ व होणारे खोदकाम यानुसार अनुदान मिळणार आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना इनलेट व आऊटलेटसह शेततळे व इनलेट व आऊटलेट विरहित अशा दोन प्रकारचे शेततळे बांधता येणार आहे. ३० बाय ३० बाय ३ आकारमानाच्या शेततळ्याला शासनाकडून ५० हजार रूपयांचे अनुदान मिळणार आहे. २५ बाय २५ बाय ३ तसेच ३० बाय २५ बाय ३, २५ बाय २० बाय ३ या आकारमानाच्या शेततळ्याला ५० हजार रूपयांचे अनुदान मिळणार आहे.

एटापल्ली-अहेरी तालुके आघाडीवर
४मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत शेततळ्याच्या लाभासाठी एटापल्ली तालुक्यातून १४८ तर अहेरी तालुक्यातून १४७ अर्ज प्राप्त झाले आहेत. भामरागड तालुक्यातून जवळपास ४० अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानंतर गडचिरोली, चामोर्शी, मुलचेरा, कोरची या चार तालुक्यातून प्रत्येकी २५ वर अर्ज प्राप्त झाले आहेत. मागेल त्याला शेततळे योजनेला या सात तालुक्यातील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणखी या तालुक्यातून शेतकऱ्यांचे अर्ज वाढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

पाच तालुके पिछाडीवर
४जिल्ह्यातील कुरखेडा, वडसा, धानोरा, आरमोरी व सिरोंचा या तालुक्यातून प्रत्येकी तीन ते चारच प्रस्ताव शेततळ्यासाठी शासन व प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. सिरोंचा, धानोरा व कुरखेडा या तालुक्यांत इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव असून इंटरनेटची पाहिजे त्या प्रमाणात गती नाही. त्यामुळे या तालुक्यातील शेतकरी शेततळ्याच्या लाभासाठी अर्ज दाखल करण्याबाबत उदासीन असल्याचे दिसून येते. कृषी विभागाने मागेल त्याला शेततळे या योजनेला शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळविण्यासाठी या तालुक्यात जनजागृती करण्याची गरज आहे.

Web Title: Receive 610 applications for the farmland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.