जनजागरण मेळाव्यातून नागरिकांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 06:00 IST2019-12-19T06:00:00+5:302019-12-19T06:00:24+5:30
जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात जिमलगट्टा उपपोलीस ठाण्याअंतर्गत पत्तीगाव येथे मंगळवारी जनजागरण मेळावा घेण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून उपविभागीय अधिकारी राहुल गायकवाड, आरोग्य सेविका दुर्गे, सर्कल इनस्पेक्टर सिडाम, तलाठी मडावी, प्रभारी अधिकारी सुरज निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

जनजागरण मेळाव्यातून नागरिकांना दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
जिमलगट्टा/गोमणी : गडचिरोली जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने अहेरी व मुलचेरा तालुक्यासह जिल्हाभरात जनजागरण मेळाव्याच्या माध्यमातून शासकीय योजनांचा जागर केला जात आहे. शिवाय नागरिकांना कपडे व इतर साहित्याचे वितरण केले जात आहे. जिमलगट्टा परिसरातील पत्तीगाव व मुलचेरा तालुक्याच्या गोमणी येथे झालेल्या मेळाव्यात नागरिकांना विविध साहित्याचे वितरण करण्यात आले.
जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात जिमलगट्टा उपपोलीस ठाण्याअंतर्गत पत्तीगाव येथे मंगळवारी जनजागरण मेळावा घेण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून उपविभागीय अधिकारी राहुल गायकवाड, आरोग्य सेविका दुर्गे, सर्कल इनस्पेक्टर सिडाम, तलाठी मडावी, प्रभारी अधिकारी सुरज निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी नागरिकांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आला. गावातील महिलांना साड्या तर पुरूषांना धोतर आणि मुलांना चप्पलचे वितरण करण्यात आले.
जात प्रमाणपत्राबाबत यावेळी माहिती देण्यात आली. गावात शाळा आहे पण शिक्षक येत नाही. शाळा व अंगणवाडी केंद्राची अवस्था बिकट आहे. आरोग्याच्या सेवेसाठी ७ ते ८ किमीची पायपीट करावी लागते, असे नागरिकांनी एसडीपीओ गायकवाड यांनी सांगितले. या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सदर मेळाव्यात आदिवासी व बिगर आदिवासी नागरिकांना शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली. योजनांच्या लाभासाठी आवश्यक दस्तावेज व प्रमाणपत्र कसे मिळवावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी राणी दुर्गावती स्पर्धेअंतर्गत वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले. यावेळी जिमलगट्टा उपपोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमधील २५० वर नागरिक मेळाव्याला उपस्थित होते. सामूहिक भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यशस्वीतेसाठी पोलीस व शिघ्रकृती दलाच्या जवानांनी सहकार्य केले.