रिकामावेळ व्यसनांची खरी जननी
By Admin | Updated: January 19, 2017 01:57 IST2017-01-19T01:57:00+5:302017-01-19T01:57:00+5:30
सकारात्मक व्यसनांनी माणसाचे आयुष्य घडते. तर नकारात्मक व्यसनांनी मात्र माणसाचे आयुष्य

रिकामावेळ व्यसनांची खरी जननी
मकरंद अनासपुरे यांचे प्रतिपादन : शिवाजी महाविद्यालयात खर्रा, गुटखा, तंबाखूची सार्वजनिक होळी
गडचिरोली : सकारात्मक व्यसनांनी माणसाचे आयुष्य घडते. तर नकारात्मक व्यसनांनी मात्र माणसाचे आयुष्य लवकरच संपते, मुख्यत्वे रिकामा वेळ व आळस हीच व्यसनांची जननी आहे. सतत क्रियाशील असलेल्या व्यक्तीला व्यसने करण्यास फारसा वेळ मिळत नाही. तंबाखू, खर्रा, बिडी, सिगारेट, दारू यारख्या नकारात्मक व्यसनांपासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी वाचन, संगीत, स्वत:च्या कामाविषयीची निष्ठा यासारखी सकारात्मक व्यसने लावून घ्यावी, असा सल्ला प्रसिद्ध मराठी चित्रपट कलावंत तथा ‘नाम’ फाऊंडेशनचे संचालक मकरंद अनासपुरे यांनी दिला.
सर्च सामाजिक संस्था, शिक्षण विभाग, मुक्तिपथ अभियान व गोंडवाना विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी दारू, तंबाखूमुक्तीचा संदेश व संकल्प, खर्रा, गुटखा, तंबाखूची सार्वजनिक होळी करून मुक्तिदिन पाळण्यात आला. सदर कार्यक्रम धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मार्गदर्शन करताना मकरंद अनासपुरे बोलत होते.
कार्यक्रमाला समाजसेवक तथा सर्च संस्थेचे संचालक डॉ. अभय बंग, अमृत बंग, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते. जगात ज्या क्रांत्या झाल्या, त्या सर्व युवकांच्या पुढाकाराने झाल्या आहेत. आपल्या समाजाला दारू, खर्रा, तंबाखू, बिडी, सिगारेट यासारखी नकारात्मक व्यसने जडली आहेत. ही व्यसने दूर करून सुदृढ समाज निर्माण करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. यासाठी युवकांनी क्रांती केली पाहिजे, ज्या व्यक्तीच्या मनात असुरक्षिततेची भावना राहते, असे व्यक्ती व्यसनांच्या आहारी जातात. हे आजपर्यंतच्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. त्यामुळे युवकांनी व्यसनी व्यक्तींचे समुपदेशन केले पाहिजे. आपल्या समाजात कुटुंब व्यवस्थेला फार महत्त्वाचे स्थान आहे. या कुटुंब व्यवस्थेत प्रत्येकाचे मत जाणून घेतले जाते व योग्य मताचा स्वीकारही केला जातो. मुलांनी त्याच्या वडिलाला चुकीचे व्यसन जडले असेल तर वडिलाला योग्य सल्ला द्यावा, प्रत्येक व्यक्तीने किमान दोन व्यक्तींना व्यसनमुक्त करण्याचा संकल्प केल्यास सुदृढ समाज निर्माण होण्यास फार मोठा कालावधी लागणार नाही. प्रत्येकाने स्वत:चा वाटा उचलला पाहिजे. भारत हा दैदिप्यमान इतिहास असलेला देश आहे. या देशातील श्रीमंतीचे वर्णन करताना इंग्रजांच्या पूर्वी सोन्याचा धूर निघत होता, असे सांगितले जाते. मात्र आज सिगारेटचा धूर चहुबाजुंनी निघत असल्याचे दिसून येत आहे. यावरून भूतकाळ व वर्तमान या दोघांची तुलना करून आपले भविष्य काय आहे, हे जाणून घेता येते. या देशात अनेकांनी स्वत:ला सकारात्मक व्यसने जडवून घेऊन देशाचे व समाजाचे उत्थान केले आहे. नकारात्मक व्यसनांनी स्वत:चे जीवन लवकर संपविण्यापेक्षा चांगली व सकारात्मक व्यसने पाळून समाजाचे भले करा. जग हे सुंदर आहे, ते आणखी सुंदर करण्याचा प्रयत्न प्रत्येक व्यक्तीने केला पाहिजे. व्यसनांमुळे मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होऊन माणूस आर्थिकदृष्ट्या अडचणीत येतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने व्यसने सोडली पाहिजेत, असा सल्ला मकरंद अनासपुरे यांनी दिला. कार्यक्रमाचे संचालन तुषार खोरगडे यांनी केले. (नगर प्रतिनिधी)
दारू प्रमाणेच खर्रा व तंबाखूसाठी आंदोलन उभारा-डॉ. बंग
२५ वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात दारूसाठी मोठे आंदोलन उभे राहिले होते. यामध्ये ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी, तरूण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर शासनाने दारूबंदी केली. असेच मोठे जनजागृतीचे आंदोलन खर्रा व व्यसनांविरोधात उभे करण्याची गरज आहे. प्रत्येक शाळा व महाविद्यालयाने तंबाखूमुक्त असल्याबाबतचे मोठे बॅनर लावावे, दर आठवड्याला व्यसनमुक्तीचा संकल्प करावा, शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात खर्रा, गुटखा यांच्या पन्न्यांची होळी करावी. मकरंद अनासपुरे हे केवळ कलावंत नाही, तर ग्रामीण भागातील शेतकरी, गरीब नागरिकांविषयी आस्था असलेला व्यक्ती आहे. सामाजिक कार्यामध्ये मकरंद अनासपुरे यांचे मोठे कार्य आहे, असे मार्गदर्शन केले.
शिक्षकांची व्यसनमुक्ती आवश्यक
शिक्षकांवर भावी पिढी घडविण्याची जबाबदारी आहे. मात्र आपला शिक्षकच व्यसनांच्या आहारी गेला आहे. काही शिक्षक खर्रा, तंबाखू, दारू पिऊन शाळेत व वर्गात प्रवेश करतात. अशा शिक्षकाकडून विद्यार्थी कोणते गुण घेणार, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे स्वत:ची नैतिक जबाबदारी समजून शिक्षकांनी स्वत: व्यसनमुक्त व्हावे. मुक्तिपथ अभियानाच्या सैनिकांनी (विद्यार्थ्यांनी) यानंतर एखादा शिक्षक वर्गात किंवा शाळेत खर्रा खाऊन आल्यास त्याचे फूल देऊन सत्कार करावे, हा उपक्रम प्रत्येक शाळेत चालल्यास सर्वप्रथम शिक्षकांची व्यसनमुक्ती होईल, त्यानंतर विद्यार्थीही व्यसनमुक्त होतील, असा सल्ला दिला.