रकमेच्या तगाद्याने रवीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2016 01:28 IST2016-08-14T01:28:03+5:302016-08-14T01:28:03+5:30
चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील सपन नागेश शहा याच्याकडून १० महिन्यांपूर्वी १ लाख ९० हजार रूपयांचे पीकअप वाहन...

रकमेच्या तगाद्याने रवीची आत्महत्या
मृतकाच्या पत्नी व वडिलाचा आरोप : ठाणेदार व सपन शहा वर कारवाई करा
एटापल्ली : चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील सपन नागेश शहा याच्याकडून १० महिन्यांपूर्वी १ लाख ९० हजार रूपयांचे पीकअप वाहन एटापल्ली तालुक्यातील कोंदावाही येथील रवी नामदेव सातपुते (२८) यांनी खरेदी केले होते. १ लाख रूपये नगदी देऊन ९० हजार रूपयांचे कर्ज घेण्यात आले होते. गाडीच्या विम्याची रक्कम २२ हजार आपल्याकडे राहील, असे सपन शहा यांनी सांगितले होते. मात्र त्यांनी २२ हजार रूपये देणार नाही, असे नंतर सांगितले. २२ हजार रूपयाची मागणी वारंवार केल्यावर सपन शहा यांनी रेगडीच्या ठाणेदाराची मदत घेऊन आपले पती रवी सातपुते यांना धमकावले. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या करून आपला जीव दिला. त्यामुळे या प्रकरणात सपन शहा व कोटमीचे ठाणेदार यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मृतक रवीचे वडील नामदेव सातपुते व पत्नी गीता सातपुते यांनी केली आहे.
या संदर्भात माहिती देताना गीता सातपुते व नामदेव सातपुते म्हणाले की, सपन शहा यांनी दोन महिन्यापूर्वी कोंदावाही येथे घरी चार व्यक्ती पैशासाठी पाठविले. त्यावेळी रवी घर नव्हता. त्यांनी मला पैसे लवकर द्या अन्यथा बघून घेऊ, अशी धमकी दिली होती, अशी माहिती गीता सातपुते यांनी दिली. तसेच सपन शहा यांनी रेगडीचे ठाणेदार माझे मित्र असून त्यांच्याकडे मी तक्रार केली आहे. त्यामुळे तुमची काही खैर नाही, अशीही धमकी दिल्याचे रवीचे वडील नामदेव सातपुते यांनी सांगितले. कोटमीचे ठाणेदार वारंवार रवीला पोलीस ठाण्यात बोलाविण्याकरिता कोंदावाही येथे माणसे पाठवायचे. परंतु रवी बाहेरगावी कामासाठी गेल्याने ठाणेदारासोबत भेट झाली नाही. परंतु आठ दिवसापूर्वी मी व माझा लहान मुलगा संजय ठाणेदाराला कोटमी येथे जाऊन भेटलो. परंतु तुमच्या सोबत काम नाही, रवीलाच पाठवा, अशी दमदाटी करून आम्हाला वापास पाठविले, असा आरोप नामदेव सातपुते, जीवन सातपुते यांनी केला. ठाणेदार आपल्याला पोलीस ठाण्यात का बोलवित आहे. या भितीने व सपन शहाच्या वारंवारच्या धमकीमुळे आपला मुलगा रवी याने आत्महत्या केली. ठाणेदार व शहा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सातपुते परिवाराने केली आहे.
शवविच्छेदनापूर्वीच दिला प्रेताचा सुपूर्दनामा
मंगळवारी ९ आॅगस्टला रवी सातपुते सकाळी १० वाजता घरून निघून गेले. घरच्यांनी शोध घेतला. रवीचे प्रेत दुसऱ्या दिवशी बुधवारी ७ वाजता शेताच्या बोडीत मिळाला. कोंदावाही पासून पाच किमी अंतरावर पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी माहिती दिली. पोलिसांनी प्रेत आणण्यास सांगितले. रात्री ११ वाजता प्रेत ट्रॅक्टरने कोटमी येथे आणले. परंतु दुसऱ्या दिवशी आणा म्हणून ठाणेदाराने प्रेत वापस पाठविले. तिसऱ्या दिवशी गुरूवारला सकाळी ७ वाजता दुसऱ्यांदा प्रेत कोटमीला नेले. सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत पाच तास प्रेत पोलीस ठाण्यात ठेवून एटापल्ली येथे पीएमला पाठविले. पीएम होण्यापूर्वीच ठाणेदारांनी प्रेताचा ताबापत्र दिले, अशी माहितीही नामदेव सातपुते यांनी दिली.
मृतक नामदेव सातपुते व आपली यापूर्वी कधीच भेट झाली नाही. त्याच्या विरूध्द कोटमी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार सुध्दा नाही. त्यामुळे त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलवून दमदाटी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ज्या दिवशी आपण धमकी दिली, असेल त्याच दिवशी आपल्या विरोधात का तक्रार केली नाही. रवीच्या मृत्यूबाबत मर्ग दाखल केला. आहे. त्याचा मृतदेह आणण्यासाठी आपण डिझेलचा खर्च व ड्रायव्हरला ५०० रूपये दिले. मृतदेह घरी परत नेण्यासाठी अगोदरच उशीर झाला होता. आणखी उशीर होऊन त्याच्या कुटुंबियांना त्रास होऊ नये, यासाठी अगोदरच सुपूर्दनामा लिहिला होता. सातपुते कुटुंबाला मदत केल्यानंतरही ते आपल्यावर असे आरोप का करीत आहे हे कळायला मार्ग नाही. त्यांनी लावलेले आरोप चुकीचे व बिनबुडाचे आहेत.
- निलेश पोळ, प्रभारी ठाणेदार, कोटमी