रवींद्रबाबा आत्रामवर वन विभाग मेहरबान का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2016 01:03 IST2016-04-26T01:03:13+5:302016-04-26T01:03:13+5:30

दोडेपल्ली गावच्या चितळ शिकार प्रकरणात सात आरोपींना अटक केल्यानंतर या प्रकरणात सक्रीय सहभाग असलेले

Ravindra Baba Atraman is the forest department? | रवींद्रबाबा आत्रामवर वन विभाग मेहरबान का?

रवींद्रबाबा आत्रामवर वन विभाग मेहरबान का?

आलापल्ली : दोडेपल्ली गावच्या चितळ शिकार प्रकरणात सात आरोपींना अटक केल्यानंतर या प्रकरणात सक्रीय सहभाग असलेले गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा सध्या भाजपमध्ये असलेले रवींद्रबाबा आत्राम यांना अटक करण्यात वन विभाग दिरंगाई करीत असल्याचे दिसून येत आहे. दीड महिना उलटूनही रवींद्रबाबा आत्राम वन विभागाच्या पथकाला हाती लागलेले नाही.
अहेरी तालुक्याच्या दोडेपल्ली गावात ६ मार्च २०१६ ला कक्ष क्रमांक ३२ मध्ये चितळाची शिकार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या ठिकाणावरून वन विभागाने चार किलो मांस व एका आरोपीला अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासात आनंद लचमा तोरेम रा. दोडेपल्ली, दीपक सडमेक, दिवाकर सडमेक, नारायण मडावी, पिंटू पेंदाम, प्रकाश पेंदाम यांना अटक केली. ज्यांच्या बैलबंडीतून हे मांस आणण्यात आले. ते विठ्ठल तलांडे यांनाही पोलिसांनी अटक केली. परंतु या प्रकरणात मुख्य भूमिका असलेले गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवींद्रबाबा आत्राम यांना मात्र अद्याप वन विभागाने अटक केलेली नाही. दीड महिना उलटूनही रवींद्र आत्राम यांच्यावर वन विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही. सात आरोपींना अटक केल्यानंतर रवींद्र आत्रामांवर वन विभाग एवढा मेहरबान का, असा प्रश्न या ठिकाणी सर्वसामान्यांना पडला आहे.
गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयात रवींद्र आत्राम यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तो न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतरही आत्राम वन विभागाकडे सरेंडर झाले नाही व अजुनही ते फरारच आहे.
या संदर्भात तपास अधिकारी तथा उपविभागीय वनाधिकारी रवी अग्रवाल यांनी सांगितले की, रवींद्र आत्राम यांना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आमच्या चमू एकत्रीतपणे दिवसरात्र काम करीत आहे. आलापल्लीचे उपवनसंरक्षक हेमंतकुमार मिना यांनी सध्या तपास सुरू आहे. आत्राम यांना पकडण्यासाठी पोलिसांचीही मदत घेतली जाईल. लवकरच त्यांना जेरबंद करण्यात यश येईल, असे सांगितले. उल्लेखनिय बाब म्हणजे, रवींद्रबाबा आत्राम यांच्या बंगल्यावर धाड घातली त्यावेळी मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा व प्राण्यांचे अवयव तेथून वन विभागाने जप्त केले होते. त्यांना चौकशीसाठी ११ मार्च रोजी उपस्थित राहण्याबाबत नोटीसही बजाविण्यात आला होता. परंतु ते उपस्थित झाले नव्हते. तेव्हापासून ते फरारच आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Ravindra Baba Atraman is the forest department?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.