कुरखेडा तालुक्यात आढळले दुर्मीळ काळमांजर; मूर्तीच्या डाेममध्ये अडकले हाेते
By गेापाल लाजुरकर | Updated: August 30, 2023 19:57 IST2023-08-30T19:57:34+5:302023-08-30T19:57:46+5:30
सामाजिक कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने काळमांजराला पकडून जीवनदान दिले.

कुरखेडा तालुक्यात आढळले दुर्मीळ काळमांजर; मूर्तीच्या डाेममध्ये अडकले हाेते
गडचिराेली : कुरखेडा तालुक्याच्या महादेवगड देवस्थान अरततोंडीच्या पायथ्याशी बसविण्यात आलेल्या भगवान महादेवच्या मूर्तीखाली असलेल्या डाेममध्ये बुधवार ३० ऑगस्ट राेजी दुर्मीळ प्रजातीचे काळमांजर (एशियन पाल्म सिवर) आढळून आले. सामाजिक कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने काळमांजराला पकडून जीवनदान दिले. महादेवगड देवस्थानाचा पायथ्याशी असलेल्या खोल दरीत डोमचे बांधकाम करून त्यावर भगवान महादेवाची मूर्ती स्थापित केली आहे. बुधवारी महादेवाच्या दर्शनाला गेवर्धा येथील डॉ. जगदीश बोरकर हे कुटुंबासह गेले होते.तेव्हा लहान मुलींना डोमच्या खिडकीतून अंधारात एका प्राण्याची हालचाल सुरू असल्याचे दिसले. तेथे काेणता तरी प्राणी अडकून असल्याचे लक्षात येताच डॉ. बोरकर यांनी भ्रमनध्वनीवरून वनविभागाकडे संपर्क केला. यावेळी शिरपूरचे क्षेत्र सहायक पी.आर. अलोने, अरततोंडीचे वनरक्षक प्रमोद निसार, वनसमितीचे अध्यक्ष मन्साराम कुमोटी, जयंत इस्कापे, अमित उईके व वनमजूर उपस्थित हाेते.
विविध नावांनी ओळख
वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देताच वनविभागाची रेस्क्यू टीम लवकरच घटनास्थळी पाेहाेचली व सदर प्राण्याची ओळख केली असता. ते दुर्मीळ काळमांजर असल्याचे स्पष्ट झाले. स्थानिक भाषेत त्याला कांडेचोर, मोह डोमरी, काळमांजर, काळजा, ताडमांजर अशा विविध नावाने ओळखले जाते, असे रेस्क्यू टीमने सांगितले.