विसोरा ग्रामपंचायतीत रंगला विधानसभा-लोकसभेच्या थाटात प्रचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:30 IST2021-01-14T04:30:50+5:302021-01-14T04:30:50+5:30
विसोरा : जेमतेम साडेचार हजार लोकसंख्येच्या विसोरा गावात ग्रामपंचायतची निवडणूक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या थाटात होत आहे. बुधवारी प्रचार ...

विसोरा ग्रामपंचायतीत रंगला विधानसभा-लोकसभेच्या थाटात प्रचार
विसोरा : जेमतेम साडेचार हजार लोकसंख्येच्या विसोरा गावात ग्रामपंचायतची निवडणूक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या थाटात होत आहे. बुधवारी प्रचार संपला असला तरी येथील प्रचारतंत्र परिसरात चर्चेचा विषय झाले. धनाढ्य गाव अशी ओळख असलेल्या या गावात १३ सदस्यपदांसाठी ३० उमेदवार रिंगणात आहेत.
निवडणूक म्हटल्यावर उमेदवाराला विजयासाठी मतदारांची मते आणि मन जिंकण्यासाठी प्रचार करावाच लागतो. गावसंसद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये आतापर्यंत नमुना मतपत्रिका वाटून दारोदारी भेटीगाठीतून अगदी साध्या पद्धतीने प्रचार केला जात असे. पण यावेळच्या निवडणुकीत मात्र चित्र वेगळे होते. ग्रामपंचायतवर विजयी पताका फडकाविण्याकरिता विधानसभा, लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने प्रचार केला जातो अगदी तसाच प्रचार, रॅली काढण्यात आली. त्यामुळे गावातील निवडणुकीला हायटेक रूप प्राप्त झाले. असा प्रचार आम्ही पहिल्यांदाच पाहत असल्याचे जुनेजाणते मतदार सांगतात.
यंदा भाजप समर्थित परिवर्तन पॅनल आणि महाविकास आघाडीचे ग्रामविकास पॅनल असे दोन पॅनल एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. प्रचाराचा अवधी संपण्याच्या शेवटच्या दोन दिवसात तर प्रचाराने पारंपरिक पद्धतीच्या समोर एक पाऊल टाकले आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत जसे चारचाकी वाहनाचा वापर करून ध्वनिक्षेपकाद्वारे उमेदवारांचा उद्घोष केला जातो, अगदी तसाच प्रचार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत केल्या गेला. प्रत्येक पॅनलची फेरी काढून दारोदारी मतांचा जोगवा मागण्यात आला.
विसोरा ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण ३,७६४ मतदार आपल्या मतदानातून १३ सदस्यांची निवड करणार आहेत. विसोरा येथे एकूण पाच प्रभाग असून, प्रभाग क्रमांक १ मधून दोन सदस्य, प्रभाग क्रमांक २, ३ आणि ४ मधून प्रत्येकी तीन सदस्य, प्रभाग क्रमांक मधून ५ मधून दोन असे एकूण १३ सदस्य निवडून दिले जाणार आहेत.