झाडीपट्टी रंगभूमीसाठी रंगकर्मींनी महामंडळ स्थापनेचे प्रयत्न करावेत

By Admin | Updated: August 10, 2016 01:38 IST2016-08-10T01:36:04+5:302016-08-10T01:38:20+5:30

तब्बल दीडशे वर्षांचा इतिहास असणाऱ्या झाडीपट्टी रंगभूमीतील सर्व कलाकार व निर्मात्यांनी एकत्रितपणे काम करावे ...

Rangers should try to establish a corporation for the botanical stage | झाडीपट्टी रंगभूमीसाठी रंगकर्मींनी महामंडळ स्थापनेचे प्रयत्न करावेत

झाडीपट्टी रंगभूमीसाठी रंगकर्मींनी महामंडळ स्थापनेचे प्रयत्न करावेत

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : देसाईगंज येथे रंगभूमीचे उद्घाटन
देसाईगंज : तब्बल दीडशे वर्षांचा इतिहास असणाऱ्या झाडीपट्टी रंगभूमीतील सर्व कलाकार व निर्मात्यांनी एकत्रितपणे काम करावे आणि संघटन शक्ती मधून महामंडळ स्थापनेचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी केले.
देसाईगंज (वडसा) येथील एका नाट्यकला रंगभूमीचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मंगळवारी झाले. त्यानंतर याबाबत विश्रामगृहात कलाकार आणि निर्मात्यांशी त्यांनी संवाद साधला, त्याप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, लेखक डॉ. परशुराम खुणे आणि दिग्दर्शक सुनील अष्टेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या चार जिल्ह्यात विख्यात असणाऱ्या या नाट्य चळवळीची वार्षिक उलाढाल ४० कोटी रुपयाहून अधिक आहे. १०० हून अधिक निर्माता असून साधारण प्रत्येकी ४० कुटुंबांना यातून रोजगार उपलब्ध होत असतो. अद्यापही ही नाट्यरंगभूमी हंगामी स्वरुपाची राहिलेली आहे. याला स्थैर्य मिळविण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे, असे जिल्हाधिकारी नायक म्हणाले.
यावेळी नाट्य निर्माता अंबादास कांबळी, सुत्रधार दत्ता चौधरी दिग्दर्शक सुनील अष्टेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी नाट्य क्षेत्रातील अनेक जण उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)

कलाकारांच्या समस्या जाणल्या
मोठ्या प्रमाणावर नाटकांची निर्मिती आणि सादरीकरण होते. मात्र नाटकांच्या संहितांना सेन्सॉर प्रमाणपत्र मिळविणे अवघड होत असे. रंगभूमीची राजधानी असलेल्या वडसा येथे सेन्सॉर मंडळाचा एकही वाचक सदस्य नाही अशी समस्या कलाकारांनी मांडली. याबाबत आपण प्रशासन स्तरावर पाठपुरावा करु, असे जिल्हाधिकारी नायक यावेळी म्हणाले.
अनेक वृध्द कलावंतांचे निवृत्ती वेतनाचे प्रश्न व प्रस्ताव प्रलंबित असल्याने रंगकर्मींनी यावेळी सांगितले. याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी नायक यांनी रंगकर्मींना दिले.

धान पीक आल्यानंतर दिवाळी ते होळी या चार महिन्यांच्या काळात या रंगभूमीवर सादर होणाऱ्या या नाटकांचा विषय साधारणपणे सामाजिकच असतो. अशा नाटकांची शासकीय योजना आणि विभाग यांच्याशी सांगड घालून त्यांना अधिक सहकार्य करण्याची भूमिका राहील, असे जिल्हाधिकारी नायक यावेळी म्हणाले. निर्मात्यांनी एकत्र येऊन कलाकारांचा विमा तसेच नोंदणी आदी कामकाज करावे त्याबरोबरच नोंदणीतून जमा होणाऱ्या भांडवलाच्या आधारावर कोल्हापूरच्या धर्तीवर महामंडळ स्थापनेचा प्रस्ताव बनवावा असे यावेळी बैठकीत ठरले. या माध्यमातून नाटकाच्या दर्जानुसार शासकीय अनुदान तसेच वित्तसहाय्यातून चित्रपट निर्मिती आणि त्यातून अधिक प्रमाणात रंगभूमीचा विस्तार शक्य आहे. याबाबतही यावेळी चर्चा झाली.

 

Web Title: Rangers should try to establish a corporation for the botanical stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.