मुलचेरात राकाँला ४६.८९ टक्के मते
By Admin | Updated: November 11, 2015 00:49 IST2015-11-11T00:49:58+5:302015-11-11T00:49:58+5:30
नऊ नगर पंचायतीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मुलचेरा तालुक्यात राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाने प्रचंड यश मिळविले आहे.

मुलचेरात राकाँला ४६.८९ टक्के मते
११ जागा मिळाल्या : १०९२ पैकी राकाँच्या वाट्याला ५११ मतदान
गडचिरोली : नऊ नगर पंचायतीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मुलचेरा तालुक्यात राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाने प्रचंड यश मिळविले आहे. येथे झालेल्या मतदानात ४६.८९ टक्के मते एकट्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पारड्यात पडली. माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांनी हा चमत्कार निवडणुकीत घडवून आणला आहे.
मुलचेरा हा अहेरी विधानसभा क्षेत्रात समाविष्ट असलेला तालुका आहे. बंगाली भाषिक लोकांची वस्ती अधिक असलेल्या या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कायम प्राबल्य राहत आले आहे. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र राकाँचा हा गड काहीसा ढासळला होता. मात्र जिल्हा परिषद अध्यक्षपदावर मुलचेरा तालुक्याच्या शांतिग्राम मतदार संघातून निवडून आलेले परशुराम कुत्तरमारे विराजमान झाल्यावर त्यांनी या भागातील पक्ष संघटनेवरही लक्ष केंद्रीत केले. नगर पंचायत निवडणुका घोषित झाल्यावर मुलचेरावर काँग्रेससह भाजप, आविसंनही लक्ष घातले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराची धुरा अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यांनी धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात मुलचेरा नगर पंचायतीवर राकाँची एकहाती सत्ता कायम राखली आहे. येथे १ हजार ९२ मतदारांनी १७ प्रभागात मतदान केले. त्यापैकी ५११ मते राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले आहे. राकाँला येथे ११ जागांवर विजय मिळविता आला.
प्रभाग क्र. ५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला २५ मते मिळाली. तेथे भाजपच्या विजयी उमेदवाराला ४६ मते आहे. तर प्रभाग क्र. ६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार हनमंतू वेलादी तिसऱ्या क्रमांक राहिले. प्रभाग क्र. ९ व प्रभाग १२, प्रभाग क्र. १७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवारांना एकेरी मतदान झाले. तर प्रभाग क्र. १६ मध्ये राकाँचे नीरज नामदेवराव चापले एका मताने पराभूत झाले. एकूणच मुलचेरा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने मारलेली भरारीचे श्रेय अध्यक्ष कुत्तरमारे यांच्या खात्यातच जाणारे आहे. (जिल्हा प्रतिनिधी)