‘राखी विथ खाकी’; महिलांनी मागितले पोलिसांकडून दारू हद्दपार करण्याचे वचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 20:06 IST2021-08-27T20:05:34+5:302021-08-27T20:06:38+5:30
Gadchiroli News अहेरी तालुक्यातील विविध गाव संघटनांच्या वतीने अहेरी, येलचिल, पेरमिली व रेपनपल्ली पोलीस ठाण्यांत ‘राखी विथ खाकी’ उपक्रमांतर्गत रक्षाबंधन साेहळा पार पडला.

‘राखी विथ खाकी’; महिलांनी मागितले पोलिसांकडून दारू हद्दपार करण्याचे वचन
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : अहेरी तालुक्यातील विविध गाव संघटनांच्या वतीने अहेरी, येलचिल, पेरमिली व रेपनपल्ली पोलीस ठाण्यांत ‘राखी विथ खाकी’ उपक्रमांतर्गत रक्षाबंधन साेहळा पार पडला. यावेळी गाव संघटनेच्या महिलांनी पोलीसदादांना राखी बांधून प्रभावी दारूबंदी व गावपरिसरातून अवैध दारू हद्दपार करण्याचे वचन मागितले. (Women demanded a promise from the police to banish alcohol)
पोलीस मदत केंद्र, येलचिल येथे मुक्तिपथ गावसंघटनेतर्फे उपक्रम राबविण्यात आला. यावेळी प्रभारी अधिकारी ए. आर. इंगोले, पोलीस उपनिरीक्षक टी. आर. माने, ‘सीआरपीएफ’चे कमांडंट संजीव कुमार यांच्यासह ३० पोलीस बांधवांना १२ महिलांनी राखी बांधून परिसरातील अवैध दारूविक्री बंद करण्याची ओवाळणी मागितली.
उपपोलीस स्टेशन रेपनपल्ली येथे 'राखी विथ खाकी' उपक्रमाअंतर्गत गावसंघटनेच्या १५ महिलांनी प्रभारी अधिकारी सिंगाडे यांच्यासह १८ पोलीस बांधवांना राखी बांधून परिसरातील अवैध दारूविक्रीकडे लक्ष वेधले. तसेच परिसरात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीचा दारूबंदी असलेल्या गावांना त्रास सहन करावा लागत असून, अवैध दारूविक्रेत्यांवर तत्काळ कारवाई करण्याची ओवाळणी यावेळी महिलांनी मागितली.
उपपोलीस ठाणे राजाराम येथे विविध गावसंघटनांच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ९० पोलीस बांधवांना राजाराम व सूर्यापल्ली गाव संघटनेच्या १० महिलांनी राखी बांधून ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये सुरू असलेली अवैध दारूविक्री बंद करण्याची ओवाळणी मागितली.
आरमाेरी तालुक्यात दारूचे पाट
आरमोरी पोलीस ठाण्यात तालुक्यातील विविध गाव संघटनांतर्फे ‘खाकी विथ राखी’ उपक्रम राबविण्यात आला. यावेळी महिलांनी पोलीसदादांना राखी बांधून गावातील अवैध दारूविक्री बंद करण्याची व चंद्रपूर जिल्ह्यातून येणाऱ्या दारूवर अंकुश लावण्याची ओवाळणी मागितली. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक पंकज बोंडसे, पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांच्यासह २० पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तालुक्यातील शंकरपूर, पळसगाव, आकापूर, वासाळा व शहरातील विविध वाॅर्डांतील १८ महिलांनी पोलीस बांधवांना राखी बांधून आपापल्या गावात सुरू असलेली अवैध दारूविक्री बंद करण्याची मागणी केली. आरमाेरी तालुक्यातील शंकरनगर, पळसगाव, वासाळा, आरमाेरी शहर तसेच अन्य गावांमध्ये अवैध दारूविक्री सुरू आहे. येथे दारूचे पाट वाहत आहेत, असे महिलांनी पाेलिसांना सांगितले.