राजनांदगाव व रांगी मार्ग उखडला

By Admin | Updated: August 20, 2016 01:31 IST2016-08-20T01:31:37+5:302016-08-20T01:31:37+5:30

धानोरा-राजनांदगाव हा राज्य महामार्ग व याच तालुक्यातील रांगी-निमगाव या मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत.

Rajnandgaon and Rongi way uprooted | राजनांदगाव व रांगी मार्ग उखडला

राजनांदगाव व रांगी मार्ग उखडला

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : राज्य महामार्गाला कच्च्या रस्त्याचे स्वरूप प्राप्त
धानोरा/रांगी : धानोरा-राजनांदगाव हा राज्य महामार्ग व याच तालुक्यातील रांगी-निमगाव या मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये जमा होत असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. धानोरा-राजनांदगाव मार्गाने रात्रंदिवस जड वाहनांची वाहतूक सुरू राहते. मात्र सदर मार्ग बांधकाम विभागाने मागील पाच वर्षांपासून दुरूस्त केला नाही. त्यामुळे डांबर पूर्णपणे उखडून या मार्गाला कच्च्या रस्त्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

छत्तीसगड राज्यातील भिलाई येथून अनेक ट्रक तेलंगणा राज्यातील हैद्राबादकडे जातात. या ट्रकांसाठी धानोरा ते आष्टी मार्ग सरळ पडत असल्याने अनेक ट्रकचालक याच मार्गाने ट्रक नेतात. त्याचबरोबर इतरही वाहनांची या मार्गाने वाहतूक सुरू राहते. नेहमी अवजड वाहने जात असल्याने सदर मार्ग दरवर्षी दुरूस्त करणे आवश्यक आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने धानोरा ते छत्तीसगडपर्यंतच्या हद्दीपर्यंतचा मार्ग मागील पाच वर्षांपासून दुरूस्त केला नाही. त्यामुळे या मार्गावरील डांबर पूर्णपणे उखडून गेले आहे. मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अवजड ट्रक महामार्गावरच्या या खड्ड्यांमध्ये फसल्याची घटना आठ दिवसांपूर्वीच घडली होती. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक दिवसभर ठप्प पडली होती. डांबर पूर्णपणे निघून गेले असल्याने सदर रस्त्याला कच्च्या रस्त्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मागील पाच वर्षांपासून मार्गाची दुरूस्ती करण्यात आली नसल्याने खड्ड्यांचा आकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
सदर मार्ग दुरूस्तीबाबत अनेकवेळा बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र मागील पाच वर्षांपासून या मार्गाची दुरूस्तीच करण्यात आली नाही. धानोरा-राजनांदगाव हा राज्य महामार्ग असला तरी या महामार्गाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)

निमगाववासीय त्रस्त
रांगीपासून चार किमी अंतरावर असलेल्या रांगी-निमगाव या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. निमगाव येथे राज्य परिवहन महामंडळाची बस दिवसातून दोनवेळा ये-जा करते. खड्ड्यांमुळे बसमधील प्रवासीही त्रस्त झाले आहेत. सदर मार्ग तत्काळ दुरूस्त करण्यात यावा, अशी मागणी निमगाव येथील नागरिकांनी केली आहे.

Web Title: Rajnandgaon and Rongi way uprooted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.