बुरूड समाजाने हक्कासाठी लढा उभारावा
By Admin | Updated: March 27, 2016 01:15 IST2016-03-27T01:15:42+5:302016-03-27T01:15:42+5:30
बुरूड समाजाचा पारंपरिक व्यवसाय बांबूवर अवलंबून असून सध्या बांबूचे दर प्रचंड वाढले आहे. शासन पुरेशा प्रमाणात बांबूचा पुरवठा करीत नाही.

बुरूड समाजाने हक्कासाठी लढा उभारावा
रामकृष्ण मडावी यांचे आवाहन : बुरूड समाजाचे विदर्भस्तरीय अधिवेशन
आरमोरी : बुरूड समाजाचा पारंपरिक व्यवसाय बांबूवर अवलंबून असून सध्या बांबूचे दर प्रचंड वाढले आहे. शासन पुरेशा प्रमाणात बांबूचा पुरवठा करीत नाही. त्यामुळे बुरूड समाजाचा व्यवसाय संकटात आला आहे. बुरूड समाजाने आपल्या न्याय, हक्कासाठी संघटीतपणे लढा उभारावा, असे आवाहन माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांनी केले.
बुरूड समाज बहुउद्देशीय विकास संस्था आरमोरीच्या वतीने आरमोरी येथे शनिवारी बुरूड समाजाच्या विदर्भस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन पार पडले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुरेश गराडे होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सदस्य लक्ष्मी मने, युवा सेना जिल्हा प्रमुख चंदू बेहरे, माणिक भोयर, विनोबा गराडे, मधुकर हिरापुरे आदी उपस्थित होते.
शासनाने बुरूड कुटुंबांना बांबू लागवडीसाठी पाच एकर जमीन देऊन त्यांना आत्मनिर्भर करावे, अशी मागणी माजी आमदार डॉ. मडावी यांनी यावेळी केली. यावेळी जि.प. सदस्य लक्ष्मी मने म्हणाल्या, आरमोरी येथे वन विभागाकडे दोन इमारती तयार आहेत. या इमारतीमध्ये अगरबत्ती प्रकल्प व हस्तकला केंद्र सुरू केल्यास शेकडो कुटुंबांना रोजगार उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात उद्घाटनानंतर पहिल्या सत्रात ‘बुरूड समाजाच्या समस्यांचे निराकरण कसे करता येईल’ या विषयावर चर्चासत्र पार पडले. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी नागपूर येथील प्रा. श्रीहरी नागापुरे होते. प्रमुख अतिथी म्हणून वन परिक्षेत्राधिकारी पी. आर. तांबटकर उपस्थित होते. यावेळी प्रा. नागपुरे यांनी बांबू व्यवसायातून बुरूड समाजाचा विकास होणार नाही. त्यामुळे बुरूड समाजाने परंपरागत व्यवसायावर अवलंबून न राहता, नव्या उद्योग व व्यवसायाची कास धरावी, असे सांगितले. वन परिक्षेत्राधिकारी तांबटकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर हिरापुरे, संचालन गोपाल हिरापुरे, नरेश हिरापुरे यांनी केले तर आभार देवेंद्र हिरापुरे यांनी मानले. कार्यक्रमाला गडचिरोली जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील बुरूड समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी बुरूड समाज संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)