निवेदनांचा पाऊस; पालकमंत्री दोन तासातच भामरागडवरून परतले
By Admin | Updated: July 5, 2015 01:38 IST2015-07-05T01:38:55+5:302015-07-05T01:38:55+5:30
राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागडच्या विकासाकडे राज्य सरकारचे प्रचंड दुर्लक्ष झाले आहे.

निवेदनांचा पाऊस; पालकमंत्री दोन तासातच भामरागडवरून परतले
तुमच्यासाठी काम करणार : जनतेला केले अम्ब्रीशरावांनी मार्गदर्शन
भामरागड : राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागडच्या विकासाकडे राज्य सरकारचे प्रचंड दुर्लक्ष झाले आहे. अनेक गावात विविध समस्या आहेत. या समस्या पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या कानी घालण्यासाठी भामरागडसह पंचक्रोशीतील नागरिक शनिवारी भामरागड तालुका मुख्यालयात दाखल झाले होते. परंतु नियोजित कार्यक्रमापेक्षा तब्बल तीन-साडेतीन तास पालकमंत्री विलंबाने आले. ३.३० वाजता त्यांचे भामरागडात आगमन झाले. तोपर्यंत सकाळपासून आलेले कार्यकर्ते व गावागावातील नागरिक प्रतीक्षा करून कंटाळलेले होते. पालकमंत्री आल्यावर त्यांच्याकडे आपल्या व्यथांचे निवेदन सादर करून पालकमंत्र्यांच्या सभेकडे दुर्गम गावातील नागरिकांनी पाठ फिरवून गावाची वाट धरली. यानंतर वन विभागाने अगरबत्ती प्रकल्पासाठी नव्याने बांधलेल्या सभागृहात पालकमंत्र्यांची आढावा सभा सुरू झाली. या सभेला भाजपचे नेते बाबुराव कोहळे, प्रकाश गेडाम, उपजिल्हाधिकारी महेश आव्हाड, एसडीओ जितेंद्र पाटील, एसडीपीओ विशाल ठाकूर, तहसीलदार अरूण येरचे, भामरागड भाजप तालुकाध्यक्ष सुनिल विश्वास, जि.प. सदस्य शारदा एगलोपवार, पं.स. सभापती रंजना उईके आदी उपस्थित होते.