पाऊस पडूनही रोवणी ठप्पच
By Admin | Updated: August 31, 2015 01:18 IST2015-08-31T01:18:40+5:302015-08-31T01:18:40+5:30
मागील तीन दिवसांपासून विसोरा परिसरात दमदार पाऊस झाला आहे. मात्र धानाचे पऱ्हे करपल्याने रोवणीची कामे पूर्णपणे ठप्प पडली आहेत.

पाऊस पडूनही रोवणी ठप्पच
विसोरा परिसरातील शेतकरी चिंतातुर : हजारो हेक्टर जमीन पडित राहण्याची निर्माण झाली आहे शक्यता
विसोरा : मागील तीन दिवसांपासून विसोरा परिसरात दमदार पाऊस झाला आहे. मात्र धानाचे पऱ्हे करपल्याने रोवणीची कामे पूर्णपणे ठप्प पडली आहेत. त्यामुळे पाऊस पडूनही शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे दिसून येत आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यात पाऊस अगदी सुरूवातीपासून हुलवाणी देत आहे. दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे तळे, बोडी, तलाव, बंधारे आदी जलसाठ्यांमध्ये अपेक्षित जलसाठा जमा झाला नाही. अधून मधून पाऊस पडत आहे या पावसाने काही शेतकऱ्यांनी रोवणीला सुरूवात केली आहे. मात्र बहुतांश शेतकऱ्यांचे रोवणे अजूनही पूर्ण झाले नाही. दोन दिवस पाऊस पडल्यानंतर २० दिवस पाऊसच येत नसल्याने बांध्यांमधील पाणी आटून जात असल्याने काही दिवसात रोवणीची कामे ठप्प पडत आहेत. या प्रकारामुळे रोवणे ठप्प पडले आहेत. काही शेतकऱ्यांचे पऱ्हेसुद्धा करपले आहेत.
विसोरा, शंकरपूर परिसरात मागील दोन दिवसांत चांगला पाऊस पडला त्यामुळे प्रत्येक शेतात पाणी जमा झाले आहे. मात्र पऱ्हे करपले असल्याने धानाची रोवणी कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. काही शेतकऱ्यांच्या पऱ्यांना फुटवे फुटले आहेत. सदर पऱ्यांची रोवणी केल्यास उत्पादनाचा खर्चही भरून निघणे अशक्य आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी पऱ्हे असूनही रोवणी करणे थांबवीले आहे. धान पिकाचा दोन महिन्यांचा कालावधी निघून गेला आहे. त्यामुळे दुबार पऱ्हे टाकणेही अशक्य झाले आहे. परिणामी शेतकरीवर्ग दुहेरी पेचात सापडला आहे. या सर्व अडचणींमुळे बांधीमध्ये पाणी साचून असले तरी रोवणीला सुरूवात झाली नाही.
ज्या शेतकऱ्यांनी रोवणी केली आहे. अशा पिकांसाठी मात्र सदर पाऊस अत्यंत लाभदायक असल्याने हा शेतकरी मात्र आनंदी असल्याचे दिसून येत आहे. बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी खते, बी-बियाणे, कीटकनाशके खरेदी केली. त्यावर बराच पैसा खर्च झाला आहे. हातातील पैसा अनावश्यक खर्च झाला असल्याने शेतकरी आनखी अडचणीत सापडला आहे. शासनाने तत्काळ आर्थीक मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (वार्ताहर)