पावसाने रबीची पेरणी लांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 06:00 IST2019-11-04T06:00:00+5:302019-11-04T06:00:17+5:30
जिल्ह्यात मुख्यत: धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. धानपीक निघाल्यानंतर तसेच सिंचनाची सुविधा नसलेल्या वावरात काही शेतकरी रबी पिकांची लागवड करतात. रबी पिकांमध्ये प्रामुख्याने उडीद, मूग, चना, हरभरा, सांबार, ज्वारी, मका, बरबटी, मूगफल्ली, गहू आदी पिकांचा समावेश आहे.

पावसाने रबीची पेरणी लांबली
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मागील आठ दिवसांपासून अधूनमधून परतीचा पाऊस पडत असल्याने रबी पिकांच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. वावरांमध्ये पाणी साचले असल्याने पेरणी करणे अशक्य झाले आहे.
जिल्ह्यात मुख्यत: धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. धानपीक निघाल्यानंतर तसेच सिंचनाची सुविधा नसलेल्या वावरात काही शेतकरी रबी पिकांची लागवड करतात. रबी पिकांमध्ये प्रामुख्याने उडीद, मूग, चना, हरभरा, सांबार, ज्वारी, मका, बरबटी, मूगफल्ली, गहू आदी पिकांचा समावेश आहे. या पिकांची पेरणी प्रामुख्याने ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी व नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करतात. पेरणी करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी शेतीची मशागत केली आहे. पेरणीचे काम सुरू करण्याची तयारी सुरू असताना परतीच्या पावसाने हजेरी लावली. अधूनमधून पाऊस कोसळत असल्याने वावरांमध्ये पाणी साचले आहे. जोपर्यंत पाणी आटणार नाही, तोपर्यंत पेरणी करणे अशक्य असल्याने नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपण्याच्या मार्गावर असताना अजूनपर्यंत पेरणीच्या कामांना सुरूवात झाली नाही.
निसवलेले धान पावसामुळे कोसळले. तसेच हलक्या धानाच्या कडपांमध्ये पाणी साचल्याने धानपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. रबी पिकातून थोडेफार उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा शेतकरीवर्ग करीत असतानाच परतीच्या पावसाने रबीचीही पेरणी लांबविली आहे. रबीची पिके जानेवारी, फेब्रुवारी महिन्यापर्यंत राहतात. यातील काही पिकांना सिंचनाची गरज राहत नाही. मात्र जमिनीमध्ये ओलावा टिकून असणे आवश्यक आहे. पेरणी लांबल्यास पीक परिपक्व होण्यास विलंब होते. जमिनीतील ओलावा निघून गेल्यास पीक परिपक्व होण्यापूर्वीच करपण्याची शक्यता अधिक राहते. तसेच फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी तापमान वाढत असल्याने पीक परिपक्व होत नाही. परिणामी उत्पादनात घट होणार आहे.
अनेक दिवस राहणार ओलावा
आॅक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे जमिनीतील ओलावा पुढील एक महिना कायम राहणार आहे. जमिनीत ओलावा राहल्याने पिकांची वाढ जोमाने होते. मात्र पेरण्या लांबल्याने पीक परिपक्व होण्याचा कालावधी सुद्धा वाढतो. परिणामी जानेवारी महिन्यात पुन्हा पावसाची गरज भासते. पाऊस न झाल्यास पिकांवर मोठा परिणाम पडण्याची शक्यता राहते. अनेक शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. केवळ पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करीत आहेत.
मिरचीची लागवड थांबली
सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली, अंकिसा भागात मोठ्या प्रमाणात मिरची पिकाचे उत्पादन घेतले जाते. मिरचीची लागवड करण्यासाठी शेतकºयांनी शेत नांगरून, वखरून तयार केले आहे. अशातच दोन दिवसांपूर्वी सिरोंचा तालुक्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे मिरचीची लागवड लांबणीवर पडली आहे. जमीन वाळण्याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहे. आसरअल्ली, अंकिसाचा परिसर ज्वारी, मका व मिरची पिकासाठी प्रसिद्ध मानला जातो. या भागात झालेल्या उत्पादनाची नजीकच्या तेलंगणा राज्यात विक्री केली जाते. गोदावरी, प्राणहिता नदीवर पूल झाले असल्याने बहुतांश शेतकरी सिरोंचा तालुक्यातील भाजीपाला स्वत: तेलंगणा राज्यात जाऊन विक्री करतात. यातून बºयापैकी उत्पन्न मिळण्यास मदत होते.