रेल्वे कामाला नोव्हेंबरपासून सुरुवात
By Admin | Updated: August 21, 2015 01:50 IST2015-08-21T01:50:10+5:302015-08-21T01:50:10+5:30
बहुप्रतिक्षीत देसाईगंज-गडचिरोली या नव्या रेल्वे मार्गाच्या कामाची निविदा निघाली असून येत्या नोव्हेंबर ...

रेल्वे कामाला नोव्हेंबरपासून सुरुवात
पालकमंत्र्यांची माहिती : केंद्रीय मंत्र्यांची घेतली भेट
गडचिरोली : बहुप्रतिक्षीत देसाईगंज-गडचिरोली या नव्या रेल्वे मार्गाच्या कामाची निविदा निघाली असून येत्या नोव्हेंबर महिन्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे, अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. अम्ब्रीशराव आत्राम यांनी या रेल्वे मार्गाबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची दिल्ली येथे गुरूवारी भेट घेऊन त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.
गडचिरोली-देसाईगंज हा रेल्वेमार्ग मंजूर झाला आहे. त्यामुळे रेल्वेमार्गाच्या कामाला तत्काळ सुरू करावी, असे निवेदन आत्राम यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना दिले. यावेळी रेल्वेमार्गाची निविदा निघाली असून नोव्हेंबरपासून कामाला सुरूवात होईल, अशी माहिती रेल्वेमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी संजीवकुमार यांनी दिली. पालकमंत्र्यांनी भूपृष्ट विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील रस्ते विकासासंदर्भात चर्चा केली.
केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन चेन्ना सिंचन प्रकल्प ३८ वर्ष जुना आहे. हा सिंचन प्रकल्प अहेरी तालुक्यात आदिवासी बहूल व अतिदुर्गम नक्षलग्रस्त क्षेत्रात आहे. सदर प्रकल्पाला ४२६.४६ हेक्टर जमीन आवश्यक आहे. त्यापैकी खासगी जमीन ५३.७२ हेक्टर तर वनजमीन ३७२.७४ हेक्टर एवढी आवश्यक आहे. वनजमीन न मिळाल्याने सदर प्रकल्प रखडला आहे. वनजमीन तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पालकमंत्री आत्राम यांनी पर्यावरणमंत्री जावडेकर यांच्याकडे यावेळी केली. (नगर प्रतिनिधी)