रेल्वे मार्गाचे जाळे विस्तारित होणार
By Admin | Updated: February 5, 2017 01:26 IST2017-02-05T01:26:32+5:302017-02-05T01:26:32+5:30
वडसा-गडचिरोली या बहुप्रतिक्षीत रेल्वे मार्गासाठी जमीन अधिग्रहणाचे काम युद्धपातळीवर सुरू असतानाच नुकत्याच जाहीर झालेल्या

रेल्वे मार्गाचे जाळे विस्तारित होणार
११५ किमीचा मार्ग : मंचेरियलपर्यंत रेल्वे नेण्यासाठी सर्वेक्षणाला निधीसह मंजुरी
गडचिरोली : वडसा-गडचिरोली या बहुप्रतिक्षीत रेल्वे मार्गासाठी जमीन अधिग्रहणाचे काम युद्धपातळीवर सुरू असतानाच नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात मंचेरियल-गडचिरोली या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्यासाठी मंजुरी देत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे आता गडचिरोली जिल्ह्यात रेल्वे मार्गाचे जाळे विस्तारीत होणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातून चांदाफोर्ट-गोंदिया हा रेल्वे मार्ग जातो. या रेल्वे मार्गावर वडसा हे रेल्वेस्थानक असून वडसापासून गडचिरोली पर्यंत रेल्वे मार्ग टाकण्याच्या कामाला लवकरच सुरूवात केली जाणार आहे. या ५० किमी लांबीच्या रेल्वे मार्गासाठी ४०० कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. या रेल्वे मार्गाला केंद्र सरकारच्या वाट्यातील १६१ कोटी रूपय आतापर्यंत मिळालेले आहे. यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पातही या रेल्वे मार्गासाठी तरतूद करण्यात आली असल्याची माहिती खासदार अशोक नेते यांनी दिली आहे.
केंद्र सरकारने रेल्वे अर्थसंकल्पातून मागील तीन वर्षात या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे या रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळाली आहे. ५० किमीच्या या मार्गासाठी वन विभागाची ६९.४ तर शासनाची १२.६३ हेक्टर आणि १२५.९१ हेक्टर खासगी जमीन लागणार आहे. ही जमीन अधिग्रहण करण्यासाठी रेल्वे विभागाची वाट न पाहता, जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात भूसंपादनाचे काम हाती घेण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी जिल्ह्याचे पालक सचिव विकास खारगे यांनी याबाबतचा आढावाही घेतला होता. येत्या एक ते दीड महिन्यात रेल्वे मार्गाच्या भूमीपूजन कामाला सुरूवात केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान हे काम प्रगतीपथावर असतानाच २०१७ च्या अर्थसंकल्पात मंचेरियल ते गडचिरोली या ११५ किमीच्या रेल्वे मार्गासाठी ०.२९ लाख रूपये सर्वेक्षण कामाकरिता मंजूर करण्यात आले आहे. गडचिरोलीपर्यंत रेल्वे आल्यानंतर ती मंचेरियल आदिलाबादपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने पाऊल टाकल्याचे दिसून येत आहे. मंचेरियलकडे जाणारा हा मार्ग गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी-आष्टी-आलापल्ली-सिरोंचा असा नेला जातो की कसा जातो याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र केंद्रीय अर्थसंकल्पात याबाबत निधीची तरतूद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात महामार्गांचे जाळे मोठ्या प्रमाणावर तयार केले जात असताना रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षण कामाला केंद्र सरकारने २९ लाख रूपयांचा निधी देऊन सुरूवात केली आहे. एटापल्ली तालुक्यात सुरजागड पहाडीवर खासगी कंपन्यांकडून लोहखनिज उत्खनन केले जात आहे. भविष्यात गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती मिळण्याची शक्यता असल्याने रेल्वे मार्गाचे जाळे तयार करण्यावर भर दिला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून गडचिरोली-मंचेरियल या ११५ किमीच्या नव्या मार्गाचे सर्वेक्षण काम या वर्षाअखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे. लवकरच गडचिरोली-वडसा या रेल्वे मार्गाच्या कामाला सुरूवात होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)