चामोर्शीच्या वसतिगृहात रॅगिंग
By Admin | Updated: September 7, 2016 02:13 IST2016-09-07T02:13:32+5:302016-09-07T02:13:32+5:30
चामोशी स्थित आदिवासी विकास विभागाच्या मुलांच्या वसतिगृहात ज्युनिअर विद्यार्थ्यांची रॅगिंग करणाऱ्या १२ वरिष्ठ विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

चामोर्शीच्या वसतिगृहात रॅगिंग
१२ विद्यार्थी निलंबित : आदिवासी विकास विभागाने केली कारवाई
गडचिरोली : चामोशी स्थित आदिवासी विकास विभागाच्या मुलांच्या वसतिगृहात ज्युनिअर विद्यार्थ्यांची रॅगिंग करणाऱ्या १२ वरिष्ठ विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे. सदर कारवाई एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून करण्यात आली असून निलंबित तीन विद्यार्थ्यांविषयी यापूर्वीही तक्रार आली होती, अशी माहिती पुढे आली आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृह चामोर्शी येथे चालविले जाते. या वसतिगृहातील सहा विद्यार्थ्यांनी रॅगींग होत असल्याची लेखी तक्रार व व्हिडीओ क्लिप २९ आॅगस्टला दिली होती. त्यांच्या तक्रारीनंतर तत्काळ १२ विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले. तक्रारकर्त्या विद्यार्थ्यांनी या संदर्भात म्हटले आहे की, बंद असलेल्या एका खोलीत ही रॅगींग करण्यात येत होती. याचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात आले होते. या संदर्भात पहिल्यांदा गृहपालाकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर गृहपालाने आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे ही तक्रार व व्हिडीओ क्लिप पाठविली. त्या आधारावर १२ विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या निलंबित करण्यात आलेल्या १२ विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थ्यांनी जानेवारी महिन्यात वसतिगृहात गोंधळ केला होता. त्यानंतर परिवारातील सदस्य व आदिवासी विकास विभागाच्या वतीने त्यांचे समुपदेशन करण्यात आले. मात्र त्यांच्यात सुधारणा झाली नाही. रॅगींग करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच निलंबित केलेल्या या विद्यार्थ्यांना पाच वर्ष वसतिगृहात प्रवेशही दिला जाणार नाही, अशी माहिती आहे.