शहीद जवानाच्या मातेचे प्रश्न; पालकमंत्री स्तब्ध
By Admin | Updated: April 5, 2015 01:44 IST2015-04-05T01:44:38+5:302015-04-05T01:44:38+5:30
महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमेवर एटापल्ली तालुक्याच्या मुसपर्शी जंगल परिसरात नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या स्वरूप अमृतकर या जवानाच्या आईने ...

शहीद जवानाच्या मातेचे प्रश्न; पालकमंत्री स्तब्ध
गडचिरोली : महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमेवर एटापल्ली तालुक्याच्या मुसपर्शी जंगल परिसरात नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या स्वरूप अमृतकर या जवानाच्या आईने तब्बल १० दिवसानंतर सांत्वनासाठी पोहोचणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना खडेबोल सुनावले. चकमकीच्या घटनेच्या वेळी तत्काळ मदत मिळाली असती तर माझा मुलगा वाचला असता, असे त्यांनी सांगितले.
२२ मार्चला मुसपर्शी जंगल परिसरात नक्षलवाद्यांशी लढताना दोगे आत्राम व स्वरूप अमृतकर हे जवान शहीद झाले होते. त्यांना मानवंदना देण्यासाठी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम व जिल्ह्यातील खासदार, आमदार आले नाहीत. त्यानंतरही एकही लोकप्रतिनिधी शहिदांच्या घरापर्यंत पोहोचला नाही. राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. याबाबतचा सरकारप्रती प्रचंड रोष राजधानीतूनच इंग्रजी माध्यमांनी मोठ्या प्रमाणावर व्यक्त केला. त्यानंतर सुस्तावलेल्या सरकारमधील गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम शुक्रवारी रात्री उशिरा शहीद जवान स्वरूप अमृतकरच्या घरी पोहोचले. त्यावेळी शहीद अमृतकरच्या आई कल्पना अमृतकर यांनी आपली सारी आपबिती पालकमंत्र्यांना सुनावली.
माझा मुलगा चार तास तडफडत होता. नक्षलवाद्याशी लढणाऱ्या माझ्या मुलाच्या अंगावर बुलेटफ्रुप जॉकेट नव्हते. सायंकाळ झाली म्हणून हेलिकॉप्टर उडविता येत नाही, असे सांगून मदत देण्यात आली नाही. हेलिकॉप्टर मिळाले असते तर माझा मुलगा वाचला असता, इतर वेळी हवे तसे हेलिकॉप्टर सायंकाळी (सूर्यास्तानंतर) उडविले जाते. मात्र या घटनेत तसे झाले नाही. हेलिकॉप्टरसोबत वैद्यकीय अधिकारी द्यायला हवा, तसेच पोलिसांच्या रुग्णालयात रक्ताची व्यवस्था असायला हवी, असेही सुचविले. आपला पोरगा हा उत्तम दर्जाचा खेळाडू होता. त्याला शौर्यपदक शासनाने जाहीर करावे, अशी मागणीही कल्पना अमृतकर यांनी पालकमंत्र्यांकडे केली. पालकमंत्र्यांनी हे सारे मुकपणे ऐकूण घेतले.
यावेळी त्यांच्या समावेत गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल खाडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गेडाम, अनिल करपे, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत वाघरे, अभिजीत कोरडे, संतोष पड्यालवार, श्रीनिवास नागडीवार, राजू गव्हारे, पुष्पा लाडवे आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)