१० मिनिटांपूर्वी मिळणार प्रश्नपत्रिका
By Admin | Updated: February 19, 2015 01:40 IST2015-02-19T01:40:27+5:302015-02-19T01:40:27+5:30
२१ फेब्रुवारीपासून इयत्ता १२ वीची व ३ मार्चपासून इयत्ता १० वीची परीक्षा सुरू होणार आहे. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचन करण्यासाठी १० मिनिटापूर्वी ...

१० मिनिटांपूर्वी मिळणार प्रश्नपत्रिका
गडचिरोली : २१ फेब्रुवारीपासून इयत्ता १२ वीची व ३ मार्चपासून इयत्ता १० वीची परीक्षा सुरू होणार आहे. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचन करण्यासाठी १० मिनिटापूर्वी प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी घेतला आहे. त्यामुळे सर्व केंद्रावरील परीक्षार्थी विद्यार्थ्यांना १० मिनिटापूर्वी प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे, अशी माहिती जि. प. चे माध्यमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी दिली आहे.
परीक्षेची वेळ सुरू होण्यापूर्वी ३० मिनिटाच्या आधी परीक्षादालनात विद्यार्थ्यांनी प्रवेश करावा, सर्व केंद्रांवरील परीक्षा खोलीत २० मिनिटापूर्वी विद्यार्थ्यांना बारकोड व स्टिकरसह उत्तरपत्रिका देण्यात येईल. त्यानंतर पर्यवेक्षक विद्यार्थ्यांना बारकोड व स्टिकरची माहिती विद्यार्थ्यांना देतील. त्यानंतर पेपर सुरू होण्याच्यापूर्वी १० मिनिटाच्या आधी प्रश्नपत्रिका दिली जाईल, अशीही माहिती शिक्षणाधिकारी नरड यांनी दिली. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व परीक्षक, केंद्रसंचालक, मुख्याध्यापक, विद्यार्थी व पालकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही शिक्षणाधिकारी नरड यांनी केले आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.