मामा तलाव दुरूस्तीचा प्रश्न मार्गी लागणार
By Admin | Updated: March 20, 2015 01:21 IST2015-03-20T01:21:15+5:302015-03-20T01:21:15+5:30
राज्याच्या अर्थसंकल्पात पूर्व विदर्भातील मामा तलावांच्या दुरूस्ती व नुतनिकरणासाठी १०० कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

मामा तलाव दुरूस्तीचा प्रश्न मार्गी लागणार
गडचिरोली : राज्याच्या अर्थसंकल्पात पूर्व विदर्भातील मामा तलावांच्या दुरूस्ती व नुतनिकरणासाठी १०० कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६४५ मामा तलाव आहेत. या तलावांच्या दुरूस्तीचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये धानाचे उत्पादन घेतले जाते. धानाला सिंचनाची मोठ्या प्रमाणात गरज भासते. मामा तलावांच्या माध्यमातून ही गरज पूर्ण केल्या जाते. संपूर्ण मामा तलाव हे ५० वर्षांपूर्वीचे आहेत. काळाच्या ओघात अनेक तलावांच्या पाळी, तुरूम फुटले आहेत. परिणामी पाणी साचून राहत नाही. तलावात गाळ गोळा झाल्याने तलावाची पाणी साठविण्याची क्षमताही कमी झाली आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून धानपीक अडचणीत येण्यास सुरुवात झाली होती.
राज्याचे अर्थमंत्री पूर्व विदर्भातील असल्याने त्यांना या गंभीर समस्येची जाणीव होती. बुधवारी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात मामा तलावांच्या दुरूस्तीसाठी सुमारे १०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६४५ मामा तलाव आहेत. यातील बहुतांश तलावांची दुरूस्ती करणे आवश्यक झाले आहे. अशातच या तलावांच्या दुरूस्तीसाठी शासनाने निधी मंजूर केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. (नगर प्रतिनिधी)