लॉयडस् मेटल विरोधात पुन्हा जनआक्रोश
By Admin | Updated: April 8, 2017 01:43 IST2017-04-08T01:43:45+5:302017-04-08T01:43:45+5:30
पेसा कायद्याअंतर्गत ग्रामसभांना मालकी हक्क प्रदान केलेल्या जंगलाची लॉयडस् मेटल कंपनीकडून तोड केली जात आहे.

लॉयडस् मेटल विरोधात पुन्हा जनआक्रोश
एटापल्ली : पेसा कायद्याअंतर्गत ग्रामसभांना मालकी हक्क प्रदान केलेल्या जंगलाची लॉयडस् मेटल कंपनीकडून तोड केली जात आहे. त्यामुळे या भागातील आदिवासी नागरिकांचे वास्तव्य धोक्यात आले आहे. आदिवासींच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या लॉयडस् मेटल कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी जनहितवादी युवा समिती तसेच वनोेत्पादन मालकी हक्क जनसंघर्ष सभा तालुका एटापल्ली यांच्या वतीने राज्यपाल, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
एटापल्ली तालुक्यातील पांडे, हेडरी, मलमपहाडी, सूरजागड, हेटळकसा, मोहुर्ली या गावातील नागरिकांना पेसा कायद्याअंतर्गत वनोपजाचे अधिकार प्राप्त झाले आहेत. या वनोपजाच्या भरवशावरच येथील नागरिकांना रोजीरोटी प्राप्त होत आहे. आदिवासींची जीवन पद्धती, संस्कृती, रूढी, परंपरा, सामूहिक हद्द जंगलावर आधारित आहे. पेसा कायद्यानुसार गावाच्या सभोवताल असलेल्या नैसर्गिक संपत्तीचीही मालकी स्थानिक आदिवासींकडे सोपविण्यात आली आहे. यानुसार या परिसरातील खनिजसंपत्तीवर त्यांचाच हक्क आहे. सूरजागड, वाडे, कारमपल्ली पहाडीलगतच्या व सभोवतालच्या ग्रामसभा बांडे, हेडरी, मंगेर, मलमपहाडी, सूरजागड, मेंढेर, हेटळकसा, मोहुर्ली, नागुलवाडी गावांच्या व ग्रामसभांच्या परंपरागत हद्दीत येत असलेल्या कक्ष क्र. १९७, १९८, १९९, २२७, २२८ मधील शेकडो हेक्टर आर क्षेत्रातील साधनसंपत्तीचे अधिकार नागरिकांकडे होते. जंगलातून मिळणारे तेंदू, बांबू, मोह, हिरडा, बेहडा, आवळा, चार, डिंक, मध, मेन, कंदमुळे, औषधी वनस्पतींच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होत होता. मात्र मागील पाच दिवसांपासून मजूर यंत्राच्या सहाय्याने येथील झाडांची तोड केली जात आहे. त्यामुळे आदिवासींचा रोजगार हिरावण्याबरोबरच त्यांचे आश्रयस्थानही धोक्यात आले आहे. त्यामुळे लायड्स मेटल कंपनीचे कंत्राटदार, यंत्रचालक, वाहक व अन्य सहकाऱ्यांवर कारवाई करावी, झालेल्या नुकसानीसाठी त्यांना जबाबदार धरून त्यांच्याकडून तेवढी रक्कम वसूल करावी, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनातून ग्रामकोष समितीचे सुरेश बारसागडे, हेडरीचे गावपाटील देवू कवडो, मलमपल्लीचे समन्वयक अशोक सोहन बडा, ग्रामसभा सूरजागडचे अध्यक्ष लालसाय तलांडे, ग्रामसभा हेडरीचे अध्यक्ष रामाजी दोहे पुंगाटी आदींनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी एटापल्लीच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना तक्रार करून कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)