तुरूमाअभावी तलाव निकामी

By Admin | Updated: August 22, 2016 02:21 IST2016-08-22T02:21:25+5:302016-08-22T02:21:25+5:30

आरमोरी तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेल्या आकापूर येथील फुटक्या तलावाला तुरूम नसल्याने तलावामधील संपूर्ण पाणी वाहून जाते.

Pulmonary pond deficiency | तुरूमाअभावी तलाव निकामी

तुरूमाअभावी तलाव निकामी

३० वर्षांपासून समस्या कायम : आकापुरातील तलावाच्या फुटलेल्या पाळीकडे दुर्लक्ष
ठाणेगाव : आरमोरी तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेल्या आकापूर येथील फुटक्या तलावाला तुरूम नसल्याने तलावामधील संपूर्ण पाणी वाहून जाते. त्यामुळे या तलावावर अवलंबून असलेली धान शेती धोक्यात आली आहे.
आकापूर येथील तलाव १२ ते १५ एकर जागेत पसरला आहे. या तलावाला वन विभागाची शेकडो एकर जमीन लागून आहे. जंगलातील पाणी या तलावात साचत असल्याने सदर तलाव लवकरच भरते. या तलावातील पाण्याचा उपयोग आकापूर, सूर्यडोंगरी, किटाळी, चुरमुरा येथील हजारो एकर शेतीला होऊ शकते. मात्र या तलावाची जवळपास २० मीटर पाळ फुटली आहे. त्यामुळे तलावातील पाणी सरळ वाहून जाते. मागील ३० वर्षांपासून या तलावाची पाळ दुरूस्त करण्यात आली नाही. पाणीच साचून राहत नसल्याने या परिसरातील शेतीला सिंचनाची सुविधा सुद्धा होऊ शकत नाही.
मागील ३० वर्षांपासून येथील शेतकरी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून तलाव दुरूस्तीची मागणी करीत आहेत. मात्र शासनाने यासाठी निधी उपलब्ध करून दिला नाही. परिणामी तलावाच्या दुरूस्तीचे काम सुरू झाले नाही. या तलावात पाणी साचून राहले असते तर चार गावातील हजारो एकर जमीन सुजलाम सुफलाम झाली असती. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन शासनाकडून निधी आणावा किंवा रोहयोच्या माध्यमातून तलाव दुरूस्तीचे काम करण्यात यावे, अशी मागणी आकापूर, सूर्यडोंगरी, किटाळी, चुरमुरा येथील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Pulmonary pond deficiency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.