लोकप्रतिनिधींनी कार्यक्रमाची माहिती पोलिसांना द्यावी
By Admin | Updated: April 21, 2016 01:53 IST2016-04-21T01:53:12+5:302016-04-21T01:53:12+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी अहेरी तालुक्याच्या छल्लेवाडा येथे झालेल्या घटनेनंतर पोलीस यंत्रणा सजग झाली

लोकप्रतिनिधींनी कार्यक्रमाची माहिती पोलिसांना द्यावी
पोलीस अधीक्षकांची सूचना : दीपक आत्राम यांच्या सुरक्षेत वाढ
गडचिरोली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी अहेरी तालुक्याच्या छल्लेवाडा येथे झालेल्या घटनेनंतर पोलीस यंत्रणा सजग झाली असून जिल्ह्यातील आजीमाजी लोकप्रतिनिधींनी आपल्या पूर्व नियोजित दौऱ्यांची माहिती पोलीस प्रशासनाला द्यावी, अशी विनंती त्यांना करण्यात आली, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे. छल्लेवाडा येथील भ्याड हल्ल्यानंतर माजी आमदार दीपक आत्राम यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
छल्लेवाडा सारख्या दुर्गम भागात नक्षल्यांकडून भ्याड हल्ल्याच्या घटना धुडकावून लावण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. मात्र जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व व्हीआयपी लोकांनी दुर्गम नक्षलग्रस्त भागात कार्यक्रमासाठी दौरे करताना या पूर्व नियोजित दौऱ्याची माहिती जिल्हा पोलिसांना द्यावी, जेणे करून आम्हाला संबंधित कार्यक्रमाच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवता येईल. माजी आमदार दीपक आत्राम यांची सुरक्षा वाढविण्यात आली असून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रशिक्षित व तरूण अंगरक्षक देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही पोलीस अधीक्षक पाटील यावेळी म्हणाले.