फिरत्या मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृती
By Admin | Updated: June 21, 2015 02:11 IST2015-06-21T02:11:27+5:302015-06-21T02:11:27+5:30
शासनाच्या केंद्र पुरस्कृत विशेष सहाय्य योजना कार्यक्रमांतर्गत चामोर्शी तालुका प्रशासनाच्या वतीने ....

फिरत्या मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृती
चामोर्शी : शासनाच्या केंद्र पुरस्कृत विशेष सहाय्य योजना कार्यक्रमांतर्गत चामोर्शी तालुका प्रशासनाच्या वतीने १७ जून रोजी बुधवारला चामोर्शी तालुक्यातील नवेगाव (रै.) ते घोट या मार्गावरील २० व नवेगाव (रै.) ते विक्रमपूर मार्गावरील १० अशा एकूण ३० गावांत फिरत्या मोबाईल व्हॅनद्वारे शासकीय योजनांबाबत जनजागृती करण्यात आली.
जिल्ह्यात निराधार, वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक व मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती, विधवा, परितक्त्या, देवदासी महिला व अनाथ बालके आदींचे जीवनमान सुसह्य करण्यासाठी त्यांना विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून मासिक अर्थसहाय्य देण्यात येते. चामोर्शी तालुक्यातील नवेगाव (रै.) ते विक्रमपूर भागात फिरत्या मोबाईल व्हॅनला चामोर्शीच्या उपविभागीय अधिकारी जी. एम. तळपाडे, तहसीलदार यू. जी. वैद्य यांनी हिरवी झेंडी दाखवून जनजागृतीसंदर्भात वाहन रवाना करण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार एस. के. बावणे आदीसह निराधार योजनेच्या विभागातील कर्मचारी व योजनेचे लाभार्थी उपस्थित होते. निराधारवृद्ध, अंध, अपंग, विधवा, परितक्त्या व इतर निराधार नागरिकांनी शासकीय योजनेच्या मासिक अर्थसहाय्य लाभासाठी संबंधित तलाठ्याकडे अर्ज भरून सादर करावे, असे आवाहन तहसीलदार वैद्य यांनी केले. (शहर प्रतिनिधी)