दामरंचा येथे मार्गदर्शन मेळाव्यातून लोकजागृती
By Admin | Updated: November 27, 2015 01:48 IST2015-11-27T01:48:50+5:302015-11-27T01:48:50+5:30
दुर्गम भागातील आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन व प्रशासन प्रयत्नशील असले ....

दामरंचा येथे मार्गदर्शन मेळाव्यातून लोकजागृती
मान्यवरांचे आवाहन : विकासाच्या प्रवाहात येऊन प्रगती साधा
कमलापूर : दुर्गम भागातील आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन व प्रशासन प्रयत्नशील असले तरी अनेक आदिवासी बांधव विकासापासून वंचित आहेत. त्यामुळे या दुर्गम भागातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दामरंचा येथे लोकजागृती मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात आदिवासी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन प्रगती साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
मेळाव्याला कमलापूरचे माजी सरपंच सांबय्या करपेत, ऋषी पोरतेट, बळवंत तोरेम, भगवान मडावी उपस्थित होते. दुर्गम भागात शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सोय उपलब्ध नाही. उद्योगधंदे नसल्याने बेरोजगार युवकांची फौज निर्माण होत आहे. उच्च शिक्षणाची व्यवस्थाही मिळत नसल्याने अनेक युवक बाहेर जिल्ह्यात शिक्षणासाठी जात आहेत. मात्र गरीब आदिवासी जनतेला मूलभूत समस्या सोडविण्यातच दिवस काढावे लागत आहेत. त्यामुळे या भागाचा विकास खुंटला असल्याने लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ऋषी पोरतेट यांनी केले. यावेळी सांबय्या करपेत यांनी दारूबंदी, शिक्षण, आरोग्य आदी समस्यांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन बापू मगल, प्रास्ताविक कैलास कोरेत तर आभार कुमरे यांनी मानले. (वार्ताहर)