माओवाद्यांच्या स्टाईलने पत्रकातून पोलिसांची दुर्गम भागात जनजागृती
By Admin | Updated: September 24, 2015 01:53 IST2015-09-24T01:53:13+5:302015-09-24T01:53:13+5:30
माओवादी पत्रक व बॅनर दुर्गम भागात लावून माओवादी संघटनेच्या कार्यक्रमांची तसेच शासनाच्या विरोधातील विखारी प्रचाराची जनजागृती करीत असतात.

माओवाद्यांच्या स्टाईलने पत्रकातून पोलिसांची दुर्गम भागात जनजागृती
नक्षल्यांना सडेतोड उत्तर : शासनाच्या योजनांची देत आहे माहिती
गडचिरोली : माओवादी पत्रक व बॅनर दुर्गम भागात लावून माओवादी संघटनेच्या कार्यक्रमांची तसेच शासनाच्या विरोधातील विखारी प्रचाराची जनजागृती करीत असतात. अनेकदा नक्षल्यांच्या पत्रकबाजीमुळे दुर्गम भागातील वातावरण दहशतीत येते, अशीच नीती आता पोलिसांनी अवलंबिली असून पोलीसही असेच पत्रक लावून सरकारच्या योजनांचा प्रचार दुर्गम भागात करू लागले आहे. याचा चांगला परिणाम लोकांमध्ये दिसून येत आहे.
नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या विरोधात नेहमीच पत्रकातून जनजागृती करून लोकांमध्ये खोटा प्रचार करण्याची भूमिका अवलंबिली आहे. पोलीस चकमकीनंतर माओवादी पत्रक काढून पोलिसांवर टीका करतात. तसेच वेळोवेळी माओवादी संघटनांच्या कार्यक्रमांची माहिती पत्रकातूनच दिली जाते. लाल रंगाच्या कापडावर पांढऱ्या अक्षरात लिहिलेले हे बॅनर ग्रामीण व दुर्गम भागात लागले की, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होते हा आजवरचा अनुभव राहिलेला आहे. याचा मोठा परिणाम जनजीवनावर होतो. हीच निती आता पोलिसांनी अवलंबिली आहे. पोलिसांनीही असेच बॅनर व पत्रक छापून अतिदुर्गम भागात प्रदर्शित करणे सुरू केले आहे. अहेरी तालुक्याच्या कमलापूर भागात शासनाच्या लोक कल्याणकारी धोरणाचा परिणाम या मथळ्याखाली छायाचित्रासह पोस्टर लावलेले आहे. यातून शासनाच्या चांगल्या योजनांची देण्यात आली आहे. ग्रामीण भागात पोलीस व नक्षल यांच्या पत्रकांचे युध्द जोरदार तापले असून नागरिकांना आता पोलिसांचे पत्रक म्हणून याची ओळख होऊ लागली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील रूजू झाल्यापासून त्यांनी या नितीचा अवलंब प्रकर्षाने सुरू केल्याने ग्रामीण भागात पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून सरकारचे काम लोकांना दिसून येत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)