आरोग्यविषयक योजनांची जनजागृती
By Admin | Updated: April 7, 2016 01:33 IST2016-04-07T01:33:54+5:302016-04-07T01:33:54+5:30
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय कुरखेडाच्या वतीने महाआरोग्य अभियानांतर्गत कुरखेडा येथे शनिवारी आरोग्य विषयक

आरोग्यविषयक योजनांची जनजागृती
कुरखेडा येथे शिबिर : जननी सुरक्षा योजना, कुटुंब कल्याण, मातृत्व अनुदान व लसीकरणावर मार्गदर्शन
कुरखेडा : तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय कुरखेडाच्या वतीने महाआरोग्य अभियानांतर्गत कुरखेडा येथे शनिवारी आरोग्य विषयक योजनांच्या जनजागृतीबाबत शिबिर घेण्यात आले. या शिबिरात जननी सुरक्षा योजना, कुटुंब कल्याण कार्यक्रम यावर मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिराला मार्गदर्शक म्हणून कुरखेडाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दामले तर अध्यक्षस्थानी कढोली आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनोने उपस्थित होते. उद्घाटक म्हणून देऊळगाव केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मेश्राम तसेच प्रमुख अतिथी म्हणून बधिरीकरणतज्ज्ञ डॉ. साखरे, डॉ. ठलाल, डॉ. हुमने आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. मेश्राम यांनी आरोग्य विभागातील विविध सवलतीबाबतच्या योजना लोकांना समजावून सांगितल्या. जननी सुरक्षा योजना, कुटुंब कल्याण कार्यक्रम, मातृत्व अनुदान, मानव विकास, नियमित लसीकरण, क्षयरोग, हिवताप कार्यक्रम, कुष्ठरोग, हत्तीरोग, राजीव गांधी जीवनदायी कार्यक्रम आदींबाबत सविस्तर माहिती दिली.
डॉ. ठलाल यांनी बालक व महिलांची आरोग्य तपासणीबाबत माहिती दिली. डॉ. हुमने यांनी सिकलसेल, प्रसूती आहार, सावित्रीबाई कन्या योजना आदींबाबत माहिती दिली. डॉ. सोनोने यांनी स्त्री- पुरूष कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया व आरोग्यविषयक योजनांची माहिती दिली. किशोर खरवडे व राहुल बडोले यांनी क्षयरोगाबाबत माहिती देऊन नागरिकांनी जागृत राहावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन डॉ. दामले यांनी केले तर आभार बांबोळे यांनी मानले.
कार्यक्रमाला नर्सेस, आरोग्य सेविका, सेवक, कर्मचारी व कुरखेडा शहर व तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)