एफडीसीएमविरोधात जनक्षोभ तीव्र
By Admin | Updated: March 8, 2016 01:27 IST2016-03-08T01:27:17+5:302016-03-08T01:27:17+5:30
तालुक्यातील चिखली रिठ, चिखली तुकूम, विहीरगाव, मोहटोला, किन्हाळा, डोंगरगाव या गावातील नऊ जणांना वन

एफडीसीएमविरोधात जनक्षोभ तीव्र
देसाईगंज : तालुक्यातील चिखली रिठ, चिखली तुकूम, विहीरगाव, मोहटोला, किन्हाळा, डोंगरगाव या गावातील नऊ जणांना वन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर ५ मार्चला तीन ते चार गावातील नागरिकांनी देसाईगंज पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. पोलिसांची सदर कारवाई चुकीची असल्याने जनक्षोभ भडकण्यासाठी जबाबदार असणाऱ्या एफडीसीएमच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे पत्र आमदार क्रिष्णा गजबे यांनी राज्याचे वित्त, नियोजन, वनमंत्री तथा वन विकास महामंडळाचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांना रविवारी पाठविले आहे.
५ मार्च रोजी कटाई केलेल्या लाकडांची वाहतूक करण्यासाठी आणलेल्या एफडीसीएमच्या वाहनांना गावकऱ्यांनी अडविले. त्यामुळे गावातील वातावरण पुन्हा तीव्र झाले. एफडीसीएम अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाच ग्रामस्थ, इतर चार अशा एकूण नऊ जणांवर ३९५ कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. दरम्यान आमदार क्रिष्णा गजबे, शिवसेना जिल्हाध्यक्ष सुरेंद्रसिंह चंदेल, पं.स. सभापती प्रीती शंभरकर, पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मध्यस्थीने ग्रामस्थांना परत पाठविण्यात आले. ग्रामस्थ व एफडीसीएम अधिकाऱ्यांच्या भांडणात जोपर्यंत तोडगा निघत नाही. तोपर्यंत एफडीसीएमच्या अधिकाऱ्यांनी जंगल कटाई व वाहतूक करू नये अशा सूचना आमदार गजबे यांनी केल्या आहेत. (वार्ताहर)