ग्रामीण भागातील नागरिकांना मार्गदर्शन : अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीचा उपक्रम अहेरी : अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने पाणी वाचवा उपक्रमांतर्गत परिसरातील नागरिकांना पाणी बचतीबाबतचे पत्रके वाटून जनजागृती केली जात आहे. मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होत असल्याने काही नागरिक पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय करतात. मात्र काही नागरिकांना तसेच पशुपक्षांना पाण्यासाठी दिवसभर भटकंती करावी लागते. भविष्यात प्रत्येकालाच तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची भिती तंज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पाण्याचे महत्त्व प्रत्येक नागरिकाने समजून घेऊन पाण्याची बचत करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीने अहेरी शहर तसेच अहेरी परिसरातील ग्रामीण भागातील गावांमध्ये पत्रकांच्या माध्यमातून पाणी बचतीचे आवाहन केले जात आहे. पाणी बचतीचे भविष्यातील महत्त्व पाण्याची बचत कशा पध्दतीने करावी, प्रत्येकाने नळाला तोट्या लावाव्या, विनाकारण पाणी फेकू नये ही बाब नागरिकांच्या लक्षात आणून देत आहे. या उपक्रमाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे, योगेश आत्राम, राजू तोरे, तसेच अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीचे इतर सदस्य या उपक्रमात सहभागी होऊन नागरिकांना मार्गदर्शन करीत आहेत. नागरिकांच्या हाती पाणी बचतीबाबतचे पत्रके दिल्यानंतर त्यांना तोंडीही मार्गदर्शन केले जात आहे. अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या या उपक्रमाचे अहेरी तालुक्यातील नागरिकांनी कौतुक केले आहे. (शहर प्रतिनिधी)
पाणी बचतीबाबत जनजागृती
By admin | Updated: April 2, 2017 01:48 IST