जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती
By Admin | Updated: October 30, 2014 22:52 IST2014-10-30T22:52:34+5:302014-10-30T22:52:34+5:30
तालुक्यातील वसा येथे २९ आॅक्टोबर रोजी सायंकाळी अंधश्रद्धा निर्मूलन शाखा गडचिरोलीच्यावतीने जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती करण्यात आली.

जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती
गडचिरोली : तालुक्यातील वसा येथे २९ आॅक्टोबर रोजी सायंकाळी अंधश्रद्धा निर्मूलन शाखा गडचिरोलीच्यावतीने जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती करण्यात आली.
वसा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी सप्ताहाचा कार्यक्रम सुरू आहे. या सप्ताहानिमित्त विविध समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अंतर्गतच जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती करण्यात आली. त्याचबरोबर चमत्कारांचेही सादरीकरण करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ जिल्हा शाखा गडचिरोली तथा भ्रष्टाचार विरोध जनआंदोलन न्यासचे विश्वस्त डॉ. शिवनाथ कुंभारे, पंडित पुडके, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा गडचिरोलीचे कार्याध्यक्ष विलास निंबोरकर, दलित मित्र नानाजी वाढई, बापूजी गेडाम, भाऊराव कुमरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान नानाजी वाढई यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सामूदायीक प्रार्थनेचे महत्व पटवून दिले. पंडित पुडके यांनी ग्रामीण भागातील जनता अजूनही अंधश्रद्धेला बळी का पडते यावर आपले मत व्यक्त करून श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक कसा करावा, याविषयी विविध दाखले दिले. डॉ. शिवनाथ कुंंभारे यांनी तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील सर्व अध्यायांचा परामोश घेऊन विश्वातील मानवासाठी कशी फायद्याची आहे हे समाजावून सांगितले. विलास निंबोरकर यांनी बुवा, बाबा, हायफाय महाराज व दैवी शक्तीचा आव आणणारे चमत्काराच्या नावाखाली अज्ञानी, अशिक्षित लोकांना कसे फसवतात व आपण कसे फसत जातो याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रम संचालन दहीकर तर आभार गोहणे यांनी मानले. यशस्वीतेसाठी निशाने पाटील, भुसारी, जनार्धन धानोरकर यांच्यासह गुरूदेव भक्तांनी सहकार्य केले.