पं. स. सदस्यासह आठ जणांना अटक
By Admin | Updated: October 18, 2014 01:29 IST2014-10-18T01:29:55+5:302014-10-18T01:29:55+5:30
मुलचेरा पोलीस ठाण्या अंतर्गत असलेल्या आष्टी येथील पोलीस चौकीत पोलिसांसोबत धक्काबुक्की करून गोंधळ..

पं. स. सदस्यासह आठ जणांना अटक
मुलचेरा : मुलचेरा पोलीस ठाण्या अंतर्गत असलेल्या आष्टी येथील पोलीस चौकीत पोलिसांसोबत धक्काबुक्की करून गोंधळ घातल्याप्रकरणी मुलचेरा पंचायत समितीचे सदस्य सुभाष गणपती यांच्यासह ८ जणांना पोलिसांनी अटक केल्याची घटना गुरूवारी रात्री २ वाजताच्या सुमारास आष्टी येथे घडली. पोलिसांनी या आठही आरोपींना चामोर्शी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने या सर्व आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, मुलचेरा पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या आष्टी येथील वनविभागाच्या नाक्यावर पोलिसांनी कोपरअल्ली येथील सुबल मंडल यांच्या एम. एच. ३४- ९३३८ या क्रमांकाच्या बोलेरो वाहनातून एक पेटी विदेशी दारू पकडली. ही घटना १६ आॅक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. त्यानंतर आष्टी पोलीस चौकीत आरोपी सुबल मंडल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. दरम्यान याच रात्री १० वाजताच्या सुमारास पं. स. सदस्य सुभाष गणपती, शिवसेना तालुका प्रमुख निलकमल मंडल, उत्तम शर्मा, निखील हलदार, गोपाल मिर्झा, संजय हलदार, सुदेव वैद्य व विद्युत मंडल हे आठजण आष्टीच्या पोलीस चौकीत आले. यावेळी त्यांनी सहाय्यक फौैजदार संघरक्षित फुलझेले व भजन कोडाप यांना सुबल मंडल यांच्या वाहनातून दारू पकडली. त्याच्यावर कोणती कारवाई केली, हे आम्हाला सांगा, अशी विचारणा करू लागले. दरम्यान फौजदार फुलझेले व भजन कोडाप यांना त्यांनी धक्काबुक्की केली. वरील आठही जणांनी पोलीस चौकीत येऊन गोंधळ घातल्याची तक्रार आष्टी पोलिसांनी मुलचेरा पोलीस ठाण्यात केली. या तक्रारीवरून मुलचेरा पोलिसांनी पं. स. सदस्य सुभाष गणपती यांच्यासह आठही आरोपींवर भादंविचे कलम १४३, १४५, १४७, १४९, ३५३, २९४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. आज शुक्रवारी चामोर्शी न्यायालयासमोर आठही आरोपींना हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. (तालुका प्रतिनिधी)