१५ शाळांमध्ये हंगामी वसतिगृह
By Admin | Updated: November 23, 2015 01:11 IST2015-11-23T01:11:52+5:302015-11-23T01:11:52+5:30
कामासाठी स्थलांतरित होणाऱ्या पालकांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हाभरात १५ ठिकाणी हंगामी वसतिगृह सुरू केले आहेत. ...

१५ शाळांमध्ये हंगामी वसतिगृह
५९६ विद्यार्थ्यांची व्यवस्था : रोजगारासाठी स्थलांतरित होत असलेल्यांच्या पाल्यांना लाभ
दिगांबर जवादे गडचिरोली
कामासाठी स्थलांतरित होणाऱ्या पालकांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हाभरात १५ ठिकाणी हंगामी वसतिगृह सुरू केले आहेत. या वसतिगृहात ५९६ विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय होणार आहे. परिणामी विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्यास फार मोठी मदत होणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून जवळपास जुलै ते नोव्हेंबर या महिन्यापर्यंत रोजगार मिळतो. त्यानंतर मात्र रोजगार मिळणे बंद होते. परिणामी बहुतांश शेतमजूर व अल्पभूधारक शेतकरी रोजगारासाठी नजीकच्या चंद्रपूर जिल्ह्यात किंवा तेलंगणा, छत्तीसगड राज्यात रोजगारासाठी जातात. पालक रोजगारासाठी गेल्यानंतर पाल्यांचा राहण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे पाल्यांनाही सोबत नेले जाते. परिणामी सदर विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होते. विद्यार्थ्यालाही कष्टप्रद जीवन कंटावे लागते. अनेक दिवस शाळेपासून खंड पडल्यामुळे कधीकधी विद्यार्थी कायमची शाळा सोडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्थलांतरीत होणाऱ्या पालकांसाठी दरवर्षी हंगामी वसतिगृह निर्माण केले जातात. यावर्षी राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यात ३२ शाळांमध्ये हंगामी वसतिगृह सुरू करण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थी संख्या अत्यंत कमी असल्याने त्या शाळांमध्ये वसतिगृह सुरू करता आले नाही. १५ ठिकाणी वसतिगृह सुरू करण्यास सर्व शिक्षा अभियान विभागाने मान्यता दिली आहे.
यामध्ये कुरखेडा तालुक्यात एक, धानोरा एक, चामोर्शी एक, अहेरी तालुक्यात सात व एटापल्ली तालुक्यात पाच ठिकाणी वसतिगृह सुरू केले जाणार आहेत.
सदर वसतिगृह नोव्हेंबर ते एप्रिल या कालावधीपर्यंत चालविले जाणार आहेत. हे वसतिगृह चालविण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर सोपविण्यात आली आहे. या हंगामासाठी प्रती विद्यार्थी ८ हजार २०० रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
विद्यार्थ्याला मिळणार या सुविधा
हंगामी वसतिगृहाची संकल्पना राबविताना यापूर्वी शाळेलाच वसतिगृह बनविण्यात येत होते. मात्र बरेचशे विद्यार्थी शाळेमध्ये राहण्यासाठी तयार होत नाही. आई-वडील गेले तरी आजी-आजोबा, वडीलधारी मंडळी घरी राहतात. त्यांच्याकडेच विद्यार्थी राहण्यास पसंती दर्शवित असल्याचे शासनाच्या लक्षात आल्यानंतर यावर्षीपासून पहिल्यांदाच हंगामी वसतिगृहाची संकल्पना राबविताना सदर विद्यार्थी त्याच्या आजीआजोबाकडे राहिल्यासही त्याला वसतिगृहाच्या सुविधांचा लाभ दिला जाईल. त्याला रात्रीचे जेवन, सकाळचा नास्ता पुरविण्यात येईल. त्याचबरोबर मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत दुपारच्या जेवनाची सोय करता येईल. त्या विद्यार्थ्याला स्टेशनी, ब्रश, पेस्ट, साबन, तेल, कंगवाही पुरविण्यात येणार आहे.
गळती कमी होण्यास होणार मदत
आई-वडील रोजगारासाठी बाहेरगावी गेल्यानंतर त्यांच्यासोबत पाल्यही जात असल्याने कित्येक शाळा विद्यार्थ्यांअभावी ओस पडत होत्या. शाळेमध्ये खंड पडल्याने कित्येक विद्यार्थी शाळेत येण्यास तयारही होत नव्हते. परिणामी शाळा सोडून देत होते. हंगामी वसतिगृहाच्या सोयीमुळे विद्यार्थ्यांची सोय झाली आहे. त्यामुळे आई-वडील गेले तरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कोणताही परिणाम होत नाही. याचे सकारात्मक परिणाम मागील वर्षी दिसून आले आहेत. त्यामुळेच यावर्षीसुध्दा सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यात हंगामी वसतिगृह सुरू करण्यात आले आहे.