देसाईगंजात नियमित वीज पुरवठा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2015 03:40 IST2015-09-15T03:40:57+5:302015-09-15T03:40:57+5:30
तालुका मुख्यालयासह ग्रामीण भागात काही दिवसांपासून अनियमित वीज पुरवठा होत आहे. अनेकदा वीज गूल होत

देसाईगंजात नियमित वीज पुरवठा करा
देसाईगंज : तालुका मुख्यालयासह ग्रामीण भागात काही दिवसांपासून अनियमित वीज पुरवठा होत आहे. अनेकदा वीज गूल होत असल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे तालुक्यात नियमित वीज पुरवठा करावा, अशी मागणी देसाईगंज तालुका काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तालुक्यात अनियमित वीज पुरवठा होत असल्याने विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अभ्यासात अडथळा निर्माण होत आहे. वीज पंपाद्वारे धानाला पाणी पुरवठा करताना अडचणी येत असल्याने धान पीकही धोक्यात आले आहे. परिणामी शेतकरी त्रस्त झाला आहे. यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ४० हजार रूपयांची आर्थिक मदत करावी, अनुसूचित जाती, जमाती संवर्गाप्रमाणे इतर मागासवर्गीयांनाही विविध सवलींचा लाभ द्यावा, संयुक्त वन व्यवस्थापन समितीद्वारे अनुसूचित जाती, जमातीप्रमाणेच इतर मागासवर्गीयांनाही गॅस वितरित करावे, विविध योजनांचा लाभ इतर मागासवर्गीयांना द्यावा, अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
युवक काँग्रेसच्या मागण्या मान्य न झाल्यास देसाईगंज तालुका युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देताना तालुकाध्यक्ष नरेंद्र गजपुरे, विनायक घारगावे, रवींद्र कुथे, ठुमदेव कुकूडकार, गजू नाईक, रमेश गरमडे, आत्माराम दुधकुवर, सुरेंद्र दोनाडकर, रमेश कोहळे, नामदेव प्रधान, मोहन शेंडे, होमराज हारगुळे, दिगांबर मेश्राम, राजेंद्र दिघोरे, गोपीचंद सिंहगडे व बहुसंख्य युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)