सर्व शेतकऱ्यांना सिंचन सुविधा द्या

By Admin | Updated: April 25, 2017 00:34 IST2017-04-25T00:34:31+5:302017-04-25T00:34:31+5:30

मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला सिंचन विहीर, उपसा सिंचन योजना तसेच मामा तलाव आदी योजनांचा लाभ देऊन जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना सिंचन सुविधा पुरवा, ...

Provide irrigation facilities to all farmers | सर्व शेतकऱ्यांना सिंचन सुविधा द्या

सर्व शेतकऱ्यांना सिंचन सुविधा द्या

अशोक नेते यांचे निर्देश : पशुसंवर्धन व कृषी विभागाची आढावा बैठक
गडचिरोली : मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला सिंचन विहीर, उपसा सिंचन योजना तसेच मामा तलाव आदी योजनांचा लाभ देऊन जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना सिंचन सुविधा पुरवा, असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी अधिकाऱ्यांना दिले.
सोमवारी कॉम्प्लेक्स परिसरातील सर्कीट हाऊसमध्ये त्यांनी कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. बैठकीला आमदार क्रिष्णा गजबे, जि.प. सदस्य मिना कोडाप, उदय बोरावार, न.प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, दिलीप कौशीक, रेखा डोळस, जावेद अली आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना खासदार अशोक नेते म्हणाले, चामोर्शी तालुक्यात रेगडी येथे एकमेव कन्नमवार जलाशय आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून १४ गावातील शेतजमिनीला धरणाचे पाणी मिळत नाही. या १४ गावातील शेवटच्या शेतीपर्यंत सिंचन पोहोचण्यासाठी अधिकाऱ्यांनी तत्काळ प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश खासदार नेते यांनी दिले.
पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय आदींची माहिती त्यांनी जाणून घेतली. ६० गावांना कुक्कुट पालनात मॉडेल गाव म्हणून प्रस्ताव तयार करा, असे त्यांनी सांगितले. गडचिरोली जिल्ह्यात कुक्कुट पालन व्यवसायास मोठा वाव आहे. कोेंबड्यांना प्रत्येक वर्षी सहा महिन्याच्या अंतराने दोनदा लस देण्याचे नियोजन करावे. शेळी फार्मचा प्रस्ताव व्यापक स्वरूपात बनवून जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगारांच्या हाताला काम दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. बैठकीला कृषी व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Provide irrigation facilities to all farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.