जनावरांचे तापमानापासून संरक्षण करा

By Admin | Updated: May 20, 2014 23:36 IST2014-05-20T23:36:54+5:302014-05-20T23:36:54+5:30

वैरागड : जनावरांची उत्पादकता टिकविण्यासाठी तसेच उन्हाळ्यातील तापमानापासून दुधाळ जनावरांचे आरोग्यपूर्ण संगोपन होण्यासाठी समतोल व परिपूर्ण आहार देणे आवश्यक आहे.

Protect the animals from the temperature | जनावरांचे तापमानापासून संरक्षण करा

जनावरांचे तापमानापासून संरक्षण करा

वैरागड : जनावरांची उत्पादकता टिकविण्यासाठी तसेच उन्हाळ्यातील तापमानापासून दुधाळ जनावरांचे आरोग्यपूर्ण संगोपन होण्यासाठी समतोल व परिपूर्ण आहार देणे आवश्यक आहे. दिवसातून दोन ते तीन वेळा पाणी शिंपडणे, भरपूर पाणी पाजणे, जीवनसत्व, कॅलरीज क्षार यांचा समावेश असलेले खाद्य दिल्यानेच जनावरांचे योग्य संगोपन होऊ शकते. त्यामुळे जनावरांचे तापमानापासून योग्य संगोपन करावे असे आवाहन आरमोरी पं.स.चे पशुधन विकास पर्यवेक्षक एल. पी. लोंढे यांनी केले. उन्हाळ्यातील तापमान जनावरांना न मानवणारे असल्याने प्राथमिक स्तरावर दुधाळ जनावरांची काळजी घेताना जनावरांच्या गोठ्यात गोणपाट टाकून त्यावर पाणी शिंपडावे, दुधाळ जनावरांना दिवसातून दोन ते तीनवेळा थंड पाणी पाजावे, त्यामुळे तापमान संतुलीत राखण्यास मदत होईल. उन्हाळ्याच्या चार महिन्यात हिरवा चारा उपलब्ध होत नसल्याने अशावेळी पूर्वतयारी म्हणून हिवाळ्यातच चार्‍याचे नियोजन करावे, पशुखाद्यात साधारणपणे प्रथीनांचा समावेश करण्यासाठी हिरव्या चार्‍याचे नियोजन करावे, शरीर वाढ, नवीन पेशी व स्नायुंच्या बळकटीसाठी हिरवा मका किंवा ज्वारीचे पेंड हिवाळ्यात साठवून ठेवावे. ते उन्हाळ्यात जनावरांना चारा म्हणून उपयोगात आणता येईल. उन्हाळ्यात शेतात हिरव्या चार्‍याची लागवड करावी, त्यामुळे दुधाळ जनावरांना फायदा होऊ शकतो व पशुपालकांना दुधाचे अधिक उत्पन्न घेता येऊ शकते. उन्हाळ्यात जाणवणारी चार्‍याची टंचाई टाळण्यासाठी हिवाळ्यात भरपूर प्रमाणात साठवणूक करून ठेवावी, असा सल्ला एल. पी. लोंढे यांनी दिला. (वार्ताहर)

Web Title: Protect the animals from the temperature