जमीन खरेदी-विक्रीचे प्रस्ताव प्रलंबित
By Admin | Updated: September 24, 2015 01:44 IST2015-09-24T01:44:59+5:302015-09-24T01:44:59+5:30
जिल्ह्यातील दोन नगर पालिका व १० नगर पंचायतीच्या हद्दीलगत असलेल्या ग्राम पंचायत क्षेत्रातील जमीन खरेदी-विक्रीचे अधिकार ...

जमीन खरेदी-विक्रीचे प्रस्ताव प्रलंबित
अडचण : ग्रा. पं. कडील अधिकार पालिका व नगर पंचायतीकडे
गडचिरोली : जिल्ह्यातील दोन नगर पालिका व १० नगर पंचायतीच्या हद्दीलगत असलेल्या ग्राम पंचायत क्षेत्रातील जमीन खरेदी-विक्रीचे अधिकार आता नगर पालिकेचे मुख्याधिकारी व नगर पंचायतीच्या प्रशासकांकडे देण्यात आले आहे. पूर्वी हे अधिकार ग्राम पंचायत प्रशासनाला होते. मात्र अंमलबजावणी यंत्रणा बदलविल्यामुळे शहरालगतच्या गावातील नागरिकांनाही याचा फटका बसत आहे. शहरालगतच्या नवेगाव (मुरखळा), आष्टी, आलापल्ली व इतर शहरालगतच्या गावातील अनेक जमीन विक्रीचे प्रस्ताव प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे या गावातील नागरिक शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवून त्रस्त झाले आहेत.
गडचिरोली शहरालगत कॉम्प्लेक्स परिसराला लागून नवेगाव (मुरखळा) ग्राम पंचायतीची हद्द सुरू होते. या भागात पूर्वी प्लॉटकरिता जमीन खरेदी-विक्री केल्यानंतर ग्राम पंचायतकडे नोंद केल्यावर घर बांधकामासाठी परवानगी सहजपणे मिळत होती. परंतु राज्य शासनाच्या निर्णयामुळे १ एप्रिलपासून आता नवेगाव (मुरखळा) भागातीलही घर बांधकामाच्या परवानगीचे दीडशेवर अधिक प्रस्ताव नगर परिषदकडे प्रलंबित आहे, अशी माहिती येथील नागरिकांनी दिली आहे. नगर परिषद हे प्रस्ताव निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविते. हे प्रस्ताव तयार करण्यासाठी नव्या नियमामुळे प्रचंड मोठ्या स्वरूपात कागदपत्रांची मागणी वाढली आहे. तसेच नगर रचना विभागाकडे दोन ते अडीच टक्के विकास कराचा भरणाही नागरिकांना भरावा लागत आहे. ग्राम पंचायतीचे अधिकार काढल्यानंतर प्लॉटधारकाला मोठा आर्थिक भूर्दंड घर बांधकामाच्या परवानगीसाठी सोसावा लागत आहे. मागील सहा महिन्यांपासून या भागातील एकही प्रस्ताव मंजूर करण्यात आला नाही. त्यामुळे अनेक जणांचे घर बांधकाम रखडून पडलेले आहे.
नवेगाव ग्राम पंचायतीने आपले अधिकार काढून घेऊ नये, असा ठराव घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांना विचारणा केली असता, किती प्रस्ताव प्रलंबित आहे, हे मुख्याधिकारी, प्रशासकांना विचारून सांगतो, असे ते म्हणाले. (स्थानिक प्रतिनिधी)