नक्षलग्रस्त भागातील ४९ पुलांचे प्रस्ताव
By Admin | Updated: October 30, 2016 01:00 IST2016-10-30T00:59:04+5:302016-10-30T01:00:45+5:30
आरआरपी (रोड रिक्वायर प्लान) टप्पा २ अंतर्गत ४९ पुलांचे बांधकाम करण्यासाठी बांधकाम विभागाने प्रस्ताव तयार करून...

नक्षलग्रस्त भागातील ४९ पुलांचे प्रस्ताव
दुसरा टप्पा सुरू : केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर; वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार
गडचिरोली : आरआरपी (रोड रिक्वायर प्लान) टप्पा २ अंतर्गत ४९ पुलांचे बांधकाम करण्यासाठी बांधकाम विभागाने प्रस्ताव तयार करून केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयाकडे पाठविला आहे. केंद्र शासन लेफ्टविंग कार्यक्रमाअंतर्गत या पुलांना निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
जंगलव्याप्त भागातील गावांचा विकास स्वातंत्र्यानंतरही पाहिजे त्या प्रमाणात होऊ शकला नाही. या गावांमध्ये अजूनही सोयीसुविधांचा अभाव आहे. या बाबीचा बाहू करून नक्षल्यांनी या भागात नक्षल चळवळ उभी केली. या भागाचा विकास करूनच नक्षल्यांना तोंड देता येऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाने नक्षलग्रस्त भागांच्या विकासासाठी विशेष कृती कार्यक्रम तयार केला. या कार्यक्रमामध्ये गडचिरोली जिल्ह्याचाही समावेश आहे. या कार्यक्रमाअंतर्गत जंगलव्याप्त व नक्षलग्रस्त भागातील गावांना सोयीसुविधा पुरविल्या जात आहेत. गडचिरोली जिल्ह्यात केंद्र शासनाने मोबाईल टॉवर, पूल, रस्ते व इतर विकास कामे करण्यासाठी निधी बांधून दिला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागानेही रस्ते व पूल बांधण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला. यामध्ये ४९ पुलांचा समावेश आहे. आलापल्ली-भामरागड मार्गावरील पर्लकोटा नदीवरील पूल, व्यंकटापूर-करनेली-लंकाचेन रस्त्यावरील पूल भाडभिडी-घोट-रेगडी-कोटमी-कसनसूर मार्गावरील कोंदावाही नाल्यावरील पूल, जिमलगट्टा-किष्टापूर ते राज्य सीमा मार्गावरील मोठा पूल, कोठी-गट्टा-जिजावंडी-कुकेली मार्गावरील दोन मोठ्या पुलांचे बांधकाम, कसनसूर ते भेंडीकरणार मार्गावरील पाच मोठ्या पुलांचे बांधकाम करणे, कसनसूर-गडदापल्ली-रेकनार-भेंडीकनार रस्त्यावरील पाच पुलांचे बांधकाम करणे, धोडराज कवंडे ते राज्य सीमा रस्त्यापर्यंत चार लहान पुलांचे बांधकाम, बांडिया नदीवरील मोठा पूल, एटापल्ली-गट्टा-सूरजागड मार्गावर दोन मोठे पूल, आलापल्ली-भामरागड रस्त्यावर पेरमिली नदीवरील पुलाचे बांधकाम करणे, रेगडी-देवाडा-एटापल्ली रस्त्यावरील दिना नदीवर पूल बांधणे यांचा समावेश आहे.
प्रमुख जिल्हा मार्गांच्या दुरूस्तीमध्ये जारावंडी ते राज्य सीमा रस्त्यावरील बांडिया नदीवरील मोठ्या पुलाचे बांधकाम करणे, येडसगोंदी-अलोंगा-परसलगोंदी रस्त्यावर दोन पूल बांधणे, येडजल-बेतकाठी रस्त्यावर दोन मोठे व १३ लहान पुलांचे बांधकाम करणे, झिंगानूर-वडडेली-येडसील-कल्लेड-कोजोड-देचली रस्त्यावरील दोन पुलांचे बांधकाम करणे, नारगुुंडा-येडसलगोंदीदरम्यान तीन पुलांचे बांधकाम, रोमपल्ली-कोपेला मार्गावरील दोन पुलांचे बांधकाम, गट्टा रस्त्यावरील एका पुलाचे बांधकाम करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने केंद्र शासनाकडे पाठविला आहे. डावीकडवी विचारसणीग्रस्त अंतर्गत गृहमंत्रालयाने गोदावरील तसेच इंद्रावती नदीवरीवर पूल मंजूर केले. गोदावरील नदीवरील पूलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. हा पूल तेलंगणाला जोडतो. तर इंद्रावती नदीवरील पूल छत्तीसगड राज्याला जोडतो. पूल बांधकामासाठी निधी उपलब्ध झाल्यास वाहतुकीला गती मिळण्यास मदत होणार आहे. या पुलांच्या बांधकामाला निधी मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींचा राजकीय दबाव असणे अत्यंत आवश्यक आहे. (नगर प्रतिनिधी)
२०० पेक्षा अधिक टॉवरची उभारणी
नक्षलग्रस्त भागामध्ये मोबाईलचे नेटवर्क तयार करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने नक्षलग्रस्त भागात मोबाईल टॉवर उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. याअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात २०० पेक्षा अधिक टॉवर बीएसएनएल विभागाने उभे केले आहेत. काहींचे बांधकाम पूर्ण झाले असून ते सुरू सुद्धा झाले आहेत. तर काहींचे बांधकाम अजूनही सुरू आहे. मोबाईलचे जाळे निर्माण झाल्याने विकासाला गती मिळण्यास मदत होणार आहे.