‘प्रोजेक्ट मुंबई’ करणार लसीकरणाची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2021 05:00 IST2021-08-06T05:00:00+5:302021-08-06T05:00:58+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याबाबत उदासीनता दिसून येत आहे. लसीकरणाविषयी असलेल्या गैरसमजातून या भागात लसीकरण मोहिमेला पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे या भागात जाणीव जागृती करत समुपदेशनाच्या माध्यमातून लसीकरणात सहभागी होण्यासाठी प्रोजेक्ट मुंबई संस्था प्रयत्न करणार आहे.

‘प्रोजेक्ट मुंबई’ करणार लसीकरणाची जनजागृती
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील आदिवासी बांधवांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी ‘प्रोजेक्ट मुंबई’ या संस्थेने पुढाकार घेतला आहे. जाणीव जागृतीबरोबरच नागरिकांचे समुपदेशन करून लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी संस्थेमार्फत प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी गुरुवारी (दि.५) आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी गडचिरोली आणि प्रोजेक्ट मुंबई संस्था यांच्यात सामंजस्य करार झाला.
दूरदृश्य प्रणालीच्या (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमास प्रोजेक्ट मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिशीर जोशी, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला, सर्च संस्थेचे विश्वस्त डॉ.आनंद बंग, डॉ. हर्षा वशिष्ठ आदी उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याबाबत उदासीनता दिसून येत आहे. लसीकरणाविषयी असलेल्या गैरसमजातून या भागात लसीकरण मोहिमेला पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे या भागात जाणीव जागृती करत समुपदेशनाच्या माध्यमातून लसीकरणात सहभागी होण्यासाठी प्रोजेक्ट मुंबई संस्था प्रयत्न करणार आहे. त्यासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासनाकडून त्यांना आवश्यक ती मदत केली जाणार आहे. गावांना आरोग्यविषयक सक्षम करण्यासाठी आरोग्य स्वराज्य योजनेचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.
समूह प्रतिकारशक्ती निर्माण होण्याची गरज
यावेळी आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण महत्त्वाचे शस्त्र असून, समूह प्रतिकारशक्ती निर्माण होण्याकरिता मोठ्या प्रमाणावर लसीकरण होणे काळाची गरज आहे. जागतिकस्तरावरदेखील ज्या देशांमध्ये लसीकरणाचे प्रमाण जास्त आहे तेथे तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात जाणवल्याचे दिसून येते. त्यामुळे लसीकरण प्रभावी असून, गडचिरोलीतील आदिवासी बांधवांचे समुपदेशन करतानाच त्यांना लसीकरण मोहिमेत सहभागी करून घ्यावे, असे त्यांनी सांगितले.