१ कोटी ९९ लाखांतून भूमिगत विद्युतीकरणाच्या कामाला गती
By Admin | Updated: November 9, 2015 05:06 IST2015-11-09T05:06:22+5:302015-11-09T05:06:22+5:30
शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या जुन्या विद्युत खांबामुळे नेहमीच वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन किरकोळ

१ कोटी ९९ लाखांतून भूमिगत विद्युतीकरणाच्या कामाला गती
गडचिरोली : शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या जुन्या विद्युत खांबामुळे नेहमीच वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले होते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नगर पालिकेवर सत्ता असलेल्या युवाशक्ती आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन शासनाकडून नगरोत्थान योजनेतून १ कोटी ९९ लाख रूपयांचा निधी खेचून आणला. या निधीतून चामोर्शी मार्गावर इंदिरा गांधी चौकापासून तर जंगल कामगार सोसायटीपर्यंत भूमिगत विद्युतीकरणाचे काम करण्यात आले असून ते अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती गडचिरोली नगर पालिकेचे गटनेते प्रा. राजेश कात्रटवार यांनी ‘लोकमत’ला दिली आहे.
नगरोत्थान योजनेच्या १ कोटी ९९ लाख रूपयांच्या निधीतून चामोर्शी मार्गावर नवीन वीज खांब बसविण्यात आले. विद्युत जनित्र व रोहित्र बसवून भूमिगत वीज लाईन जोडण्यात आली. या मार्गावरील भूमिगत वीज लाईन सुरू झाली असल्याने शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. चामोर्शी मार्गावर अडथळा होत असलेले जुने वीज खांब काढण्यात आले. तसेच या मार्गावरील काही जुने वीज खांब काढण्याचे काम शिल्लक असून ते दिवाळीनंतर करण्यात येणार आहे.
माजी नगराध्यक्ष भूपेश कुळमेथे यांच्या कार्यकाळात सन २०१३-१४ या वर्षात युवाशक्ती आघाडीने पुढाकार घेऊन चामोर्शी व चंद्रपूर मार्गावरील भूमिगत विद्युतीकरणाचे काम मंजूर केले होते. चामोर्शी मार्गावरील भूमिगत विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून ते लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. दिवाळीनंतर चंद्रपूर मार्गावर इंदिरा गांधी चौकापासून ते कॉम्प्लेक्सपर्यंत भूमिगत विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती प्रा. राजेश कात्रटवार यांनी दिली. चंद्रपूर मार्गावरील काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात धानोरा व आरमोरी मार्गावरही भूमिगत विद्युतीकरणाचे काम घेण्यात येणार आहे. चारही मार्गावरील भूमिगत विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर या चारही मार्गावरील वाहतूक सुरळीत होऊन अपघाताला पूर्णत: आळा बसणार आहे, असा आशावाद प्रा. कात्रटवार यांनी व्यक्त केला आहे.
भूमिगत विद्युतीकरणाच्या कामासाठी शासनाकडून निधी खेचून आणण्यात विधान परिषद सदस्य आ. मितेश भांगडिया व चिमूरचे आ. बंटी ऊर्फ किर्तीकुमार भांगडिया यांच्या नेतृत्वात युवाशक्ती आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी यश मिळविले आहे, असे प्रा. कात्रटवार यांनी स्पष्ट केले. (स्थानिक प्रतिनिधी)
तीन प्रभागात होणार विकास कामे
४गडचिरोली नगर पालिकेला दलित वस्ती योजनेंतर्गत राज्य शासनाच्या वतीने जिल्हास्तरावरून प्राप्त झालेल्या पाच कोटी रूपयांच्या निधीतून दलित वस्ती असलेल्या प्रभाग क्र. ४, प्रभाग क्र. ५ व प्रभाग क्र. ६ मध्ये सिमेंट काँक्रिट नाल्या, सिमेंट काँक्रिट रोड व डाबरीकरण रस्ते आदी विकास कामे करण्यात येणार आहे. या कामांची निविदा प्रक्रिया आॅक्टोबर महिन्यात पूर्ण होणार असून सदर कामे नोव्हेंबर महिन्यात हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती प्रा. राजेश कात्रटवार यांनी दिली आहे.
दलित वस्तीचा निधी सव्वा तीन कोटींनी वाढला
४सन २०१३-१४ पर्यंत गडचिरोली पालिकेला राज्य शासनाच्या वतीने जिल्हास्तरावरून १ कोटी ८० लाखांचा दलित वस्तीचा निधी मिळाला होता. यापेक्षा अधिक निधी गडचिरोली न. प. ला शासनाकडून कधीही मिळाला नाही. दलित वस्ती निधीतून शहरात अधिकाधिक विकास कामे करण्याचा संकल्प युवाशक्ती आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. त्यानंतर नगर पालिकेचे गटनेते प्रा. राजेश कात्रटवार, न. प. उपाध्यक्ष प्रा. रमेश चौधरी, बांधकाम सभापती आनंद श्रृंगारपवार यांनी विधान परिषद सदस्य आ. मितेश भांगडिया व चिमूरचे आ. बंटी भांगडिया यांच्या नेतृत्वात शासनाकडे सातत्याने निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा केला. सन २०१५-१६ या वर्षासाठी नगर पालिकेला दलित वस्ती योजनेतून पाच कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. तब्बल ३ कोटी २० लाख रूपयांचा दलित वस्ती योजनेचा निधी वाढवून आणण्यात युवाशक्तीच्या नेत्यांना यश आले आहे.